तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं भाजपा नेत्या पंकजा मुंडे या नाराज मानल्या जातात. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ या त्यांच्या वक्तव्यावर चांगलीच चर्चा रंगली. आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागतच होईल, या शब्दात त्यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. पण एकंदरीत राजकीय स्थिती पाहता पंकजा मुंडेंसाठी काय फायद्याचं ठरेल याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याविषयी बोलले आहेत.
नेमकं काय म्हणाले शंभुराज देसाई?
- पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत.
- स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे.
- त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल.
- त्यांचा योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून राखला जाईल.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
- योग्य निर्णय घ्यायची वेळही योग्य असते, अविचारानं काही करायचं नसतं.
- मोठा नेता नेहमी त्याग करतो, मुंडे साहेबांनी हेच केलं.
- मूठ आपली शक्ती आहे, हीच शक्ती कमी करण्याचा डाव आपण कधी करु द्यायचा नाही.
- पांडवावर अन्याय झाला होता की नाही? त्यांनी फक्त सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचं कौरव म्हणाले. पण तरीही पांडवांनी धर्मयुद्ध जिकलं.
- त्यांनीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. जो चांगला असतो, तो लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठी उभे आहोत.
- कौरवांच्या सेनेतील अनेक लोक मनानं पांडवांच्या सोबत होते. फक्त शरीरानं कौरवांच्या सोबत होते. कळलं का तुम्हाला?
- माझे संस्कार निर्भय राजकारणाचे आहेत. आपलं घर आपण का सोडायचं? हे घर आपण प्रेमानं आणि कष्टानं बनवलंय? ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू.
- जेव्हा मला वाटेल आता इथं राम नाही, तेव्हा बघू! त्याग करायचा तिथं त्याग करू.
पंकजा मुंडेंच्या फायद्याचं काय?
महाराष्ट्र भाजपात सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द अंतिम मानला जात आहे, असं दिसतंय. महाराष्ट्रातून टीम नरेंद्र निवडताना विझन देवेंद्रलाच महत्व देण्यात आल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे प्रीतम मुंडेंऐवजी राज्यसभा खासदार भागवत कराड यांची वर्णी लागली. लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं बोलल्यामुळेच पंकजा मुंडे यांना भाजपाच्या राज्यातील सत्ताकाळापासून डावलण्यास सुरुवात झाली. जनादेश यात्रेच्या वेळीही पंकजा मुंडे यांचा विरोध असतानाही विनायक मेटे यांना जाहीर महत्व देण्यात आलं. त्यामुळे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, केला जाईल, असं पंकजा मुंडे यांना वाटणं स्वाभाविकच आहे.
पण आजचा भाजपा हा काँग्रेसप्रमाणे होत आहे. एका नेत्यालाच सर्वाधिकार देताना विरोधातील दुसऱ्यांना संपवू देणे भाजपा श्रेष्ठी मान्य करतील, असं नाही. त्यामुळे जसं राष्ट्रीय पातळीवरील पद देऊन पंकजा मुंडे यांना राजकारणातील अस्तित्व विधानसभा पराभवानंतरही शाबूत ठेवलं गेलं तसंच भविष्यातही त्यांना महत्व दिलं जाईल. पण जर ते वाढवलं गेलं नाही तर काय?
पंकजा मुंडे किती संयम ठेवतील?
जर भाजपामध्ये त्यांच्याऐवजी कराडांसारख्यांना बळ देऊन हळूहळू सोबतचं समर्थकांचं बळ हिरावलं जात आहे, असं पंकजा मुंडे यांच्या लक्षात आलं तर त्या म्हणाल्या तसं, “ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू. जेव्हा मला वाटेल आता इथं राम नाही, तेव्हा बघू! त्याग करायचा तिथं त्याग करू”. त्यांना वाटलं तर त्या पुढचा निर्णय घेण्यासाठी छत पडायचीच वाट पाहतील, असंही नाही.
पंकजा मुंडेंसमोर पर्याय काय?
काँग्रेस
पर्याय निवडणारा राजकारणी हा सत्तेच्या संरक्षणाचाही विचार करत असतो.
काँग्रेस हा सर्वसमावेशकतेमुळे चांगला पर्याय ठरला असता. पण सध्यातरी त्या काँग्रेसला पर्याय मानतील असे वाटत नाही. कारण आजही राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर तो पक्ष स्वबळावर किंवा हमखास सत्तेत वाटेकरी असण्याची शक्यता नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या वडिलांच्या हयातीतच त्यांची साथ सोडून गेलेले धनंजय मुंडे हे आहेत. त्यांनी विधानसभेत त्यांचा पराभवही केला होता. त्यामुळे परळी कुणाची? हा प्रश्नही भेडसावेल. काही टोकाचं मत मांडतात. वेगळं काही घडेल. मग पंकजा मुंडेंसाठी राष्ट्रवादी हाही पर्याय असू शकेल. पण सध्यातरी तसं वाटत नाही.
शिवसेना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या आमंत्रणामुळेच पंकजा मुंडेंच्या पुढील वाटचालीचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे शिवसेना या पर्यायावर विचार केला तर एकेकाळी बीडच्या राजकारणात चांगलं अस्तित्व असणारी शिवसेना गोपीनाथ मुंडेचा प्रभाव वाढत गेला तशी जिल्ह्यात निष्प्रभ होत गेली. बीडच्या राजकारणात सध्यातरी शिवसेनेकडे मुंडेंसारखं प्रभावी नेतृत्व नाही. तेवढंच नाही शिवसेना जातीपातीचा विचार करत नाही, असं असलं तरी सध्याच्या राजकारणात तो घटक महत्वाचा असतो. शिवसेनेकडे वंजारी समाजात प्रभावी नेतृत्व नाही. फक्त एकच मुद्दा असेल. जर पंकजा मुंडेंच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा असेल तर शिवसेनेत ती पूर्ण होणं तेवढं सोपं नाही. मुळात शिवसेना आघाडीच्या, युतीच्या कोणत्याही राजकारणात ठाकरे कुटुंबाबाहेर सत्तेचं नेतृत्व देईल, का असा प्रश्न असेल. त्यात बदल झाला तरी एकनाथ शिंदेंसारखे लोकांमधील प्रभावी, अनिल देसाईंसारखे मातोश्रीच्या विश्वासातील असे इतर पर्याय असताना पंकजा मुंडेंचा नंबर तसा सहजतेने लागेल असे नाही.
शिवसेनेत पंकजा मुंडेंना मोठं होण्याची संधी असेल पण सध्या भाजपामध्येही त्या जास्त मोकळेपणाने भूमिका घेतात, तशा शिवसेनेच्या शिस्तीच्या चौकटीत घेता येतील का, याबद्दल शंकाच आहे.
त्यामुळे एकंदर विचार केला तर सध्या तरी जो पर्यंत अस्तित्वच संपवण्याचा टोकाचा प्रयत्न झाला नाही, तर पंकजा मुंडे अन्य पक्षांकडे वळतील असे नाही.