मुक्तपीठ टीम
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. दौऱ्यासाठी ते रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले. आज सकाळी ते शासकीय सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले आणि थेट लालबागचा राजा येथे पोहोचले. शाह यांच्यासोबत त्यांचे कुटिंबीय व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही नेते सुद्धा होते. गणेशाच्या चरणी पुष्प अर्पण करून दर्शन घेतले. मात्र, एकीकडे गणेश दर्शनाचा धार्मिक उद्देश असला तरी शाहांच्या भेटीचा राजकीय अजेंडाही होताच. त्यामुळे त्यांनी “मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपाचं असावं” असा आदेश मुंबईतील भाजपा नेत्यांना दिला.
लालबाग दर्शनानंतर अमित शहा यांनी आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. तिथून ते थेट सह्याद्री बंगल्यावर दाखल झाले. येथे अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीला संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत “राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपाचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे” अशा शब्दांत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपाने १५० जागांचे टार्गेट ठेवले असेल तरी सोबत शिंदे गट असणार आहे. महापालिका निवडणूक ही शिंदे गटाला सोबत घेऊन लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले अमित शहा…
- २०१९मध्ये पहिल्यांदा भाजपाचं संपूर्ण बहुमताचं सरकार आलं. असं पहिल्यांदाच झालं आहे.
- २०१४ मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला.
- शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला.
- महाराष्ट्रातलं हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं आहे.
- नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले.
- उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली आहे.
- भाजपाने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही.
मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक आहे, असे समजा आणि लढा : देवेंद्र फडणवीस
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.
- देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की, मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे.
- गणेशोत्सवात सगळीकडे भाजपाचाच बोलबाला आहे.
- आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा.
- आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले.
- ‘मिशन मुंबई’ साठी सर्व पदाधिकरी नगरसेवक भाजपा कार्यकर्त्यांचे महत्वाची भूमिका आहे.
- आता सर्वांनी तयारी जोरदार करायची असेही फडणवीसांनी सांगितले.