मुक्तपीठ टीम
२००२ च्या गुजरात दंगलीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. गुजरात दंगल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यांनी दंगलीच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी आणि अलीकडच्या काळात ईडीने राहुल गांधींकडे केलेल्या चौकशीशी तुलना करत मोदीजींनी एसआयटीसमोर नाटक केलं नसल्याचं सांगितले.
मोदीजींनी एसआयटीच्या चौकशीदरम्यान मला पाठिंबा देण्यासाठी या असं आवाहन केलं नाही. आमदार आणि खासदारांना बोलवलं नाही,’ असं सांगत अमित शाहा यांनी यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना नाव न घेता टोला लगावला.
गुजरात दंगलीबाबत अमित शाहा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी झाली. यामध्ये आम्हाला क्लीन चिट मिळाली आहे. याशिवाय नानावटी आयोगाने आपल्या अहवालात नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली आहे. त्यानंतरही एसआयटी स्थापन करण्यात आली. मात्र आम्ही एसआयटीला नेहमीच सहकार्य केले. कारण, न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा विश्वास आहे. आम्ही त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे.
मी पंतप्रधान मोदींच्या वेदना जवळून पाहिल्या
- ‘एका बड्या नेत्यानं काहीही न बोलता आणि भगवान शंकरानं विषप्राशन केल्याप्रमाणं सर्व वेदना झेलतानाच १८ ते १९ वर्षांची मोठी लढाई लढली आहे.
- या सगळ्या वेदना सहन करताना मी त्यांना खूप जवळून पाहिलं आहे.
- केवळ एक प्रचंड इच्छाशक्ती असलेली व्यक्तीच कोणतंही भाष्य न करण्याची भूमिका घेऊ शकत होता.