मुक्तपीठ टीम
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले की, कट्टरपंथी सामग्री पसरवण्यासाठी दहशतवादी डार्कनेटचा वापर करत आहेत. यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापरात वाढ झाली आहे. शाह म्हणाले की, डार्कनेट पॅटर्नवर तोडगा काढण्याची गरज आहे. सुरक्षा पायाभूत सुविधा आणि आर्थिक व्यवस्थेत प्रगती असूनही, दहशतवादी तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी आणि आर्थिक संसाधने वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. केंद्रीय गृहमंत्री ‘नो मनी फॉर टाटर’ या तिसऱ्या मंत्रिस्तरीय परिषदेला संबोधित केले.
अमित शाह पुढे म्हणाले की, आमचा विश्वास आहे की दहशतवादाचा धोका कोणत्याही धर्म, राष्ट्रीयत्व किंवा गटाशी जोडला जाऊ शकत नाही आणि नसावा. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सुरक्षेच्या पायाभूत सुविधा, कायदेशीर आणि आर्थिक प्रणाली मजबूत करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. असे असूनही, दहशतवादी हिंसाचार घडवून आणण्यासाठी, तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी आणि त्यांची आर्थिक संसाधने वाढवण्यासाठी सतत नवीन मार्ग शोधत आहेत.
डार्कनेटवर उपाय शोधणे आवश्यक !!
- दहशतवादी कट्टरतावादी साहित्य पसरवण्यासाठी आणि त्यांची ओळख लपवण्यासाठी डार्कनेटचा वापर करत आहेत.
- याशिवाय क्रिप्टोकरन्सीसारख्या आभासी मालमत्तांचा वापर वाढला आहे.
- या डार्कनेटचा पॅटर्न समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे.
- आभासी मालमत्ता हे आमच्यासमोर एक नवीन आव्हान आहे.
- आर्थिक व्यवहाराच्या नवनवीन पद्धती दहशतवाद्यांकडून वापरल्या जात आहेत.
- व्हर्च्युअल अॅसेट चॅनेल, फंडिंग स्ट्रक्चर्स आणि डार्कनेटचा वापर यावर कारवाई करण्यासाठी सुसंगतपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे.
अमित शाहांचा निशाणा नेमका कोणावर?
- शाह म्हणाले, दुर्दैवाने असे काही देश आहेत जे दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला सामूहिक संकल्प कमकुवत करू इच्छितात, अडथळे निर्माण करू इच्छितात.
- आम्ही पाहिले आहे की काही देश दहशतवाद्यांना संरक्षण देतात आणि त्यांना आश्रय देतात, एखाद्या दहशतवाद्याला संरक्षण देणे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
- असे घटक त्यांच्या मनसुब्यांमध्ये कधीही यशस्वी होऊ नयेत ही आमची सामूहिक जबाबदारी असेल.
- शाह म्हणाले की, दहशतवादी आणि दहशतवादी गट आधुनिक शस्त्रे आणि माहिती तंत्रज्ञानातील बारकावे आणि सायबर व आर्थिक क्षेत्रातील गतिशीलता चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि वापरतात.