मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं गृहराज्य असणाऱ्या गुजरातला लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. या राज्यातील अहमदाबादमध्ये लवकरच जगातील सर्वात मोठे क्रीडा शहर उभारले जाणार आहे. ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा विशेष गीत आणि शुभंकर अनावरण कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अहमदाबादमधील ईकेए एरिना, ट्रान्सस्टेडिया येथे ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी विशेष गीत आणि मॅस्कॉटचे अनावरण करण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, अहमदाबाद शहर लवकरच जगातील सर्वात मोठे क्रीडा शहर म्हणून विकसित केले जाईल. “दहा वर्षांपूर्वी मोदीजी येथे मुख्यमंत्री असताना त्यांनी खेल महाकुंभ सुरू केला होता. तेव्हा जागतिक नकाशावर खेळात गुजरात कुठेच नव्हते असे ते म्हणाले.
२९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत गुजरातमधील सहा शहरांमध्ये देशातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा रंगणार आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “आम्हाला आनंद होत आहे की ७ वर्षांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. आणि ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि भव्य स्पर्धा असेल. ” “साधारणपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक वर्षे लागतात , मात्र गुजरातने तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हे करून दाखवले असे अनुराग ठाकूर म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे हे सर्व शक्य झाले, भारतीय ऑलिम्पिक संघटनेनें देखील या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. १२ हजाराहून अधिक खेळाडू, अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना येथे क्रीडा स्पर्धेबरोबरच गरब्याचाही आनंद घेता येईल ,” असे ते म्हणाले.
शुभंकर म्हणजेच मॅस्कॉटचा अर्थ काय?
या स्पर्धेसाठीच्या शुभंकर अर्थात मॅस्कॉटचे अनावरण करण्यापूर्वी राज्यातील अव्वल ३ शाळा, जिल्हे आणि महानगरपालिकांसह खेल महाकुंभातील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. गुजरातीमध्ये सावजचा अर्थ सिंह असा असून हे नाव असलेला मॅस्कॉट भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतो तसेच जगज्जेता बनण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताच्या वेगवान विकासाची झलकही दाखवतो.