मुक्तपीठ टीम
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या या परीक्षा आता जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक ठरल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जाहीर करणार आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. अमित देशमुख यांच्या ट्विटनुसार “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे”.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विविध स्तरावर वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली जात होती. दरम्यान सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत परीक्षा पुढे ढकलणासाठी मागणी केली होती. या मागण्यांची दखल घेत अमित देशमुख यांनी ७२ तासात यासंबंधीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज वैद्यकीय परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांनीही केली होती मागणी
• कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे या परिस्थितीत १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान वैद्यकीय परीक्षा होत आहेत.
• परंतु ४५० विद्यार्थी व तेवढेच पालक कोरोनाग्रस्त आहेत.
• तसेच त्यांच्याकडे अभ्यासाची साधने उपलब्ध नाहीत.
• ही परीक्षा तब्बल ५० हजार विद्यार्थी देणार आहेत.
• ही संख्या लक्षात घेतली असता कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
• परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थांकडूनही होत आहे.
• त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चाकरून योग्य निर्णय घ्यावा.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनीही विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षेला महत्व देणार नसल्याचे सांगत परीक्षा पुढे ढकलणार असल्याचे संकेत दिले होते, वाचा ती बातमी: