मुक्तपीठ टीम
बोगस वैद्यकीय व्यवसायी शोधून काढण्याकरिता जिल्हा, तालुका, महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर दर महिन्याला बैठक घेण्यात येणार असून फ्लाईंग स्कॉडची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. त्याकरिता व्याप्ती व नियम अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोगस डॉक्टरकडून उपचार घेत असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास तर त्यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येते. एखाद्या जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायिकांचा सुळसुळाट असेल तर अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करण्यात येईल. त्यापैकी समित्यांची व्याप्ती वाढविण्यासाठी या समित्यांवर विधानसभा सदस्यांचाही समावेश करण्याबाबत विचार करून समित्यांची पुनर्रचना करण्यात येईल, असेही अमित देशमुख यांनी सांगितले.
यासंदर्भातील लक्षवेधी विधान परिषद सदस्य विलास पोतनीस, अभिजित वंजारी, ॲड मनिषा कायंदे, संजय दौंड, किरण सरनाईक, अमोल मिटकरी, सुनिल शिंदे यांनी मांडली होती.