मुक्तपीठ टीम
जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेत दीड लाखांहून समर्थक आणि चाहते असलेल्या युट्युब ब्लॉगर क्रिस्नल यांनी त्यांचे लोणावळा येथील हॉटेल मालक विनीत आणि प्रसिद्धी झेले यांच्या सोबत पनवेलचा महागणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी काही मिनिटाचा लाईव्ह शो करून कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि पनवेलचा महागणपतीला साता समुद्रापार नेले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमाची माहिती, महागणपतीबद्दल विशेष माहिती याशिवाय सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्राविषयी इंग्रजीतून माहिती दिल्यानंतर क्रिस्नल यांनी अतिशय नम्रपणे समाधान व्यक्त करत कांतीलाल कडू यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले.
झेले दाम्पत्याकडे पाहुणी आलेल्या क्रिस्नल यांना भारतीय संस्कृती, धर्म, वेद, पुराण, सण आणि संस्कृतिक चळवळीविषयी अपार श्रद्धा असल्याचे त्यांनी कडू यांच्याशी संवाद साधताना सांगितले. गणेशोत्सवानिमित्त भारतात आलेल्या क्रिस्नल यांना गणपती दर्शनासाठी लोणावळ्यातून पनवेलला यावेसे वाटले आणि महागणपतीची देखणी, आकर्षक, आश्वासक मूर्ती, डोळ्यांतून पाझरणारे प्रेम पाहून त्या भावुक झाल्या. भव्य मूर्ती, दिव्य देखावा आणि शांतरसाची अनुभूती घेत हभप अरुणबुवा कारेकर यांच्या संगीत भजनाता तल्लीन झाल्या. त्यांनी भजनाची गोडी चाखत लाईव्ह शोतून पनवेलचा महागणपती, भजन परंपरा आणि भक्तीचा कळस सर करत अमेरिकन नागरिकांना खूष केले. स्वतःही श्रद्धा सबुरीचा अनुभव घेत महागणपतीच्या चरणी लोटांगण घातले.
पहिल्याच दिवशी आनंद सोहळा रंगत असताना अनाहुतपणे आलेल्या अमेरिकन पाहुणीने पनवेलचा महागणपती जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेतील नागरिकांच्या हृदयात विराजमान करुन कांतीलाल कडू यांचे प्रेम, भक्ती आणि निखळ सेवेची जबरदस्त पोचपावती देत पनवेलकरांची कीर्ती वाढवली आहे.