मुक्तपीठ टीम
कोरोना संकटकाळात माणसं एकमेकांपासून शरीरानं दुरावली पण मनानं जवळ आली. माणुसकीच्या भावनेतून भारताना जगातील अनेक देशांना लस पुरवली तर परदेशातून भारतात मदत आली. ताजं उदाहरण मैत्री थाई प्रोजेक्टच्या माध्यमातून थायलंडमधील बौद्ध उपासकांनी भारतीयांना भेट दिलेल्या ३१ रुग्णवाहिकांचं आहे. थायलंडमधील पूजनीय भंते अजाहन जयासारो यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध आयएएस अधिकारी डॅा हर्षदीप कांबळे आणि रोजाना कांबळे यांच्या सहकार्याने ही मदत लाभलीय. या कार्यक्रमाला थायलंडचे कॉन्सुलेट जनरल सिरिकुलही उपस्थित होते.
पुण्यामधील टाटा मोटर्सच्या आवारात भिक्षु संघाच्या उपस्थितीत या रुग्णावाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भगवान बुद्धांचा उपदेशाची आठवण करुन देण्यात आली, ते सांगतात, जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो. अर्थात हे जग एकमेकांवर निर्भर आहे. भगवान बुद्ध दानपारमितेला अत्यधिक महत्व देतात, ही शिकवण अखिल मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे.
भारतामधे जेव्हा कोरोनाची दुसरी लाट वाढली होती तेव्हा दुःख, वेदना आणि चिंताग्रस्त भारतीयांसाठी थायलंडच्या बौद्ध उपासक़ांनी मदतीचा हात दिला. संवेदनशीलता, दानपारमिता, मैत्रीभावना, समर्पण आणि महाकरुणा या बुद्ध वचनांचा अनोखा मिलाप दोन्ही देशांचा दुवा ठरला.
मैत्री थाई प्रोजेक्टच्या माध्यमातून थाईलंमधील थेरवादा फ़ॉरेस्ट ट्रेडिशनचे परमपूजनीय भंते अजाहन जयासारो यांच्या आवाहनानुसार थाईलंडच्या बौद्ध उपासकांनी हे कार्य केले. त्यांनी भारतीय जनतेसाठी बुद्धांनी संगितलेल्या दानभावने नुसार ३१ रुग्णवाहिकांची बहुमोल अशी मदत केली आहे.
महाराष्ट्राचे विकास आयुक्त डॅाक्टर हर्षदीप कांबळे यांच्या माध्यमातून ही सर्व वैद्यकीय सहायता भारताला प्राप्त झाली. त्यापैकी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, व्हेंटिलेटर्सचे यापूर्वी वितरण झालेले आहे. आता लोकार्पण झालेल्या रुग्णवाहिका बोधगया, सारनाथ, राजगीर, कुशीनगर, लेह-लदाख या बौद्ध स्थळांसह नागपुर, औरंगाबाद, बंगलोर, दिल्ली या ३१ जिल्ह्यांमध्ये सेवारत असतील.