मुक्तपीठ टीम
भारतात अंबानींचा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हा एक महाकाय उद्योग समूह आहे. अनेक क्षेत्रातील त्यांच्या अस्तित्वामुळे ते सर्व व्यापी मानले जातात. मात्र गेली काही वर्षे अदानींच्या रुपानं या उद्योग समुहासमोर आव्हानं उभी राहत आहेत. आता मात्र अंबांनींच्या रिलायन्सनं नव्या उद्योग क्षेत्रांमध्ये आक्रमक भूमिका घेत अदानींसमोर आव्हान उभं करण्याची रणनीती ठरवली असल्याचं दिसतं.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड येत्या काळात २२१ अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि विविधीकरणासाठी २.७५ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. यासोबतच कंपनीने दैनंदिन वापराच्या उत्पादनांच्या विभागात म्हणजेच FMCG सेक्टरमध्ये उतरण्याची घोषणा करून अदानी समूहाला टक्कर देण्याची तयारी केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची नवी रणनीती
- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जवळजवळ ५०० कंपन्या आहेत आणि हा भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा समूह आहे.
- रिलायन्स समुहामध्ये रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स हेल्थ या पाच सूचीबद्ध कंपन्या आहेत.
- हा समूह आर्थिक सेवा, बांधकाम, मनोरंजन, ऊर्जा, आरोग्य सेवा, उत्पादन, संरक्षण, विमान वाहतूक आणि वाहतूक सेवा प्रदान करतात.
- रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी कंपनीची उत्तराधिकार योजना आखली आहे की त्यांची मुलगी ईशा रिटेल व्यवसायाची आणि धाकटा मुलगा अनंत ऊर्जा व्यवसाय सांभाळेल. आकाश सध्या जियोच्या टेलिकॉम डेटा विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत.
- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानी यांनी या सर्व घोषणा केल्या. ते म्हणाले की, यावर्षी दिवाळीपर्यंत रिलायन्स जियो दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकातासारख्या मोठ्या शहरांमध्ये ५जी सेवा सुरू करेल.
- पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत देशभरात जियो ५जी ऑफर केले जाईल. हे करण्यासाठी २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल.
अंबानी एफएमसीजी क्षेत्राची व्याप्ती वाढवणार!
- दैनिक उपभोग उत्पादन क्षेत्र म्हणजेच एफएमसीजी व्यवसायात उतरण्याची घोषणा करताना, ईशा म्हणाली की परवडणाऱ्या किंमतीत उच्च दर्जाची उत्पादने देऊन प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन गरजा पूर्ण केल्या जातील.
- रिलायन्स रिटेल, रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल शाखा, आता विस्तार योजनेचा भाग म्हणून स्वतःच्या ब्रँडसह एफएमसीजी क्षेत्राची व्याप्ती वाढवेल. त्याची कमान मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी करणार आहे.
- रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी असून १५ हाजार १९६ स्टोअर्स किराणा माल आणि इतर विविध उत्पादने विकतात. या क्षेत्रात कंपनीची थेट स्पर्धा गौतम अदानीशी होईल.
एफएमसीजी क्षेत्रात दूध, फळे, भाज्या, आणि औषधांसारख्या इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होतो.
या क्षेत्रातील रिलायन्सचा आक्रमक प्रवेश हा अदानींसाठी एक नवं आव्हान उभा करणार मानला जातो. सध्या त्यांच्या कंपनीचं त्या क्षेत्रात वर्चस्व आहे.