मुक्तपीठ टीम
आतापर्यंत गाय म्हटलं की हिंदुत्ववाद्यांकडेच पाहिले जात असे, आता मात्र न्यायालयीन वर्तुळातही ‘गो’प्रेम दिसत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मांडलेलं मत तसं दाखवणारंच आहे. न्यायाधीश शेखर कुमार यादव यांनी गाय ही भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून, गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करा, असं मत स्पष्ट शब्दात मांडले आहे. गायीच्या कत्तलीचा आरोप असलेल्या जावेद या आरोपीचा जामीन फेटाळताना न्यायालयाने हे मत मांडले. गायीला जगण्याचा मूलभूत हक्क देण्यावरून न्यायालयाने महत्वाचे भाष्य केले आहे.
न्यायाधीशांचे ‘गो’प्रेम!
- न्यायाधीश शेखर कुमार यादव यांनी जामीनावर निकाल देताना हे मत मांडले. सरकारने संसदेत एक विधेयक आणले पाहिजे.
- त्यात गाईला मौलिक अधिकार द्यावे आणि राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केले जावे.
- उच्च न्यायालयाने आपल्या सूचनेत म्हटले आहे की, केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणावे आणि गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्यावा.
- गाईचे कल्याण होईल तेव्हा देशाचे कल्याण होईल.
- गाय ही भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
- संसदेने कोणताही कायदा केला तरी सरकारने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे.
- गायीला नुकसान पोहोचवणाऱ्यांना शिक्षा देणारा कायदा तयार केला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती शेखर कुमार यादवांचे सरळस्पष्ट मत
- गोरक्षा केवळ एका धर्माचे काम नाही.
- गाय ही या देशाची संस्कृती आहे आणि तिचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
- तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे महत्त्वाचे नाही.
न्या. यादवांनी मांडलेले ११ महत्वाचे मुद्दे
- मूलभूत अधिकार केवळ गोमांस खाणाऱ्यांनाच नाही.
- जे गायींची पूजा करतात आणि आर्थिकदृष्ट्या गायींवर अवलंबून असतात त्यांनाही तसेच मूलभूत अधिकार आहेत.
- जगण्याचा हक्क मारण्याच्या अधिकारापेक्षा अधिक आहे.
- गोमांस खाण्याचा अधिकार हा कधीही मूलभूत अधिकार मानला जाऊ शकत नाही.
- गाय म्हातारी आणि आजारी असतानाही त्यांचा उपयोग होतो.
- तिचे शेण आणि मूत्र शेती, औषधांसाठी खूप उपयुक्त आहे.
- केवळ हिंदूंनाच गायींचे महत्त्व समजले असे नाही. मुस्लिमांनीही गायीला भारताच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानले आहे.
- पाच मुस्लिम शासकांनी गायींच्या कत्तलीवर बंदी घातली. बाबर, हुमायून आणि अकबर यांनी त्यांच्या धार्मिक सणांमध्ये गायींच्या कुर्बानीवरही बंदी घातली.
- अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे गायी भुकेने आणि गोठ्यात रोगाने मरतात. पॉलिथीन खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू होतो.
- संपूर्ण जगात भारत हा एकमेव देश आहे, जिथे विविध धर्माचे लोक राहतात, जे वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात, पण त्यांची विचारसरणी एकच आहे.
- जेव्हा गायींचे कल्याण होईल तेव्हा देशाचे कल्याण होईल
न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी हा निकाल देताना सांगितले की, सरकारने आता संसदेत विधेयक आणावे.