मुक्तपीठ टीम
गुजरातमधील २००२ च्या गोध्रा घटनेनंतर बिल्किस बानो यांच्यावरील सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व ११ दोषींची सोमवारी गोध्रा उप कारागृहातून सुटका करण्यात आली. गुजरात सरकारने त्यांच्या माफी धोरणानुसार त्यांची सुटका करण्यास मान्यता दिली. राधेश्याम शाही, जसवंत चतुरभाई नाई, केशुभाई वदानिया, बकाभाई वदानिया, राजीवभाई सोनी, रमेशभाई चौहान, शैलेशभाई भट्ट, बिपिन चंद्र जोशी, गोविंदभाई नाई, मितेश भट्ट आणि प्रदीप मोढिया अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत.
बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी मुंबईतील विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) न्यायालयाने २१ जानेवारी २००८ रोजी ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली. या दोषींनी १५ वर्षांपेक्षा जास्त कारावास भोगला,यानंतर एका कैद्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून त्यांना माफ करता येईल का, हे पाहण्याचे निर्देश गुजरात सरकारला दिले होते. या निर्देशानंतर गुजरात सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने सर्व ११ आरोपींना माफी देण्याचा निर्णय एकमताने घेतला. समितीच्या या निर्णयाची माहिती राज्य सरकारला देण्यात आली. यानंतर या सर्वांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले.
गोध्रा घटनेनंतर बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता
- ३ मार्च २००२ मध्ये दाहोद जिल्ह्यातील रंधिकपूर गावात बिलकिस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता.
- त्यावेळी बिल्किस बानो पाच महिन्यांची गर्भवती होती.
- तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली.
- अन्य सहा सदस्य घटनास्थळावरून पळून गेल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
- या प्रकरणातील आरोपींना २००४ मध्ये अटक करण्यात आली होती.