मुक्तपीठ टीम
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपाचा दणदणीत पराभव करून मोठा विजय मिळवला असतानाच ममता बॅनर्जींना मात्र पराभव पत्करावा लागला होता. भाजपाच्या घेराबंदीमुळे तसं घडल्याचं मानलं जातं. त्यापासून धडा घेत अखिलेश यादव यांनी एका मतदारसंघात अडकून पडण्याऐवजी संपूर्ण राज्यांच्या लढतीवर लक्ष देण्यासाठी मोकळं राहण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता आहे.
लॅपटॉप-मोबाइल चालवता न येणारे मुख्यमंत्री!
- अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तरुणांची विचारसरणी समजत नसल्याबद्दल टोला लगावला आहे.
- आजच्या युगात ज्या तरुणांना लॅपटॉप आणि मोबाईल चालवायचे हेच कळत नाही अशा तरुणांचे हित कसे समजणार?
- तरुण हे या देशाचे भविष्य असून तरुणच तरुणांचे मन समजू शकतात.
- आतापर्यंत आम्हाला माहित होते की, आमच्या मुख्यमंत्र्यांना लॅपटॉप कसा चालवायचा हे माहित नाही, पण आताच एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना मोबाईल कसा चालवायचा हे ही माहित नाही.
- जरा विचार करा, आजच्या युगात मोबाईल आणि लॅपटॉप चालवता न येणाऱ्या तरुणांना काय समजणार?
भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपा समाजात जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करत असल्याचा आरोप करत अखिलेश म्हणाले की, “जगामध्ये भारताची ओळख ही अनेक धर्म आणि जातींचे लोक एकत्र राहण्याची आहे. आमच्याशी संघर्ष करणारी कोणतीही विचारधारा असेल तर ती आम्ही स्वीकारणार नाही”, असेही ते म्हणाले. समाजवादी विचारसरणीचा मार्ग दाखवणाऱ्या आपल्या देशाच्या संविधानाचे आपण पालन करतो. असे म्हणत अखिलेश यांनी टोला लगावला.
नाव बदलणे भाजपाला आवडते!
अखिलेश यादव पुढे म्हणाले की म्हणाले की, “भाजपची सर्वात आवडती दोन कामे म्हणजे प्रथम वेगवेगळ्या ठिकाणांची नावे बदलणे आणि दुसरे म्हणजे शौचालये बांधणे. ते म्हणाले की, समाजवादी पूर्वांचल एक्सप्रेसवे जो सपा सरकारच्या काळात बांधला जात होता, त्याचे नाव मुख्यमंत्र्यांनी बदलले.
त्याचप्रमाणे, सपा सरकारमध्ये न्यूयॉर्क पोलिसांच्या आधारावर उत्तर प्रदेश पोलिसांची हेल्पलाइन सेवा ‘यूपी १००’ सुरू करण्यात आली. ही अशी सेवा होती की गावातून कोणी फोन केला तर पोलिस त्याच्या मदतीला यायचे. पण मुख्यमंत्री योगी यांनीही त्याचे नाव बदलून ‘डायल ११२’ केले.