गौरव साळी / जालना
जालना जिल्ह्यातील मंठा शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य अशी ५०१ फूटी विक्रमी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती. स्वामी महाविद्यालयात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या तिरंगा पदयात्रेने शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण केले. यावेळी हर घर तिरंगा – घर घर तिरंगा, भारत माता की जय अश्या घोषणा देण्यात आल्या.
कोल्हापुरातील ३०३ फूट उंच राष्ट्रध्वजाला पोलीस दलाकडून सलामी
उदयराज वडामकर / कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेल्या ३०३ फूट उंच स्तंभावरील राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रीमती मीनाताई गुरव, वसंतराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस विभागाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. अमृतमहोत्सवी दौड, सायकल रॅली, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही वेगवेगळ्या कार्यक्रम घेण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अंजलीताई पाटील, समरजितसिंह घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्वज उभारण्यासाठी मेहनत घेतलेले तंत्रज्ञ, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राणाची आहुती दिली. अनेकांच्या त्याग, बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा शासकीय पातळीवरच न राहता लोकसहभागातून राबविण्यावर भर देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. याचसाठी राष्ट्रध्वज उभारण्यासाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आले, असे सांगून कोल्हापूर मधील पोलीस उद्यानातील ३०३ फूट उंचीवरील राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह मेहनत घेतलेल्या चमुचे त्यांनी कौतुक केले.
कोरोना परिस्थितीमुळे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल, असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गतः साधनसंपत्ती आहे. विविध संस्थांच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती सारखे अनेक चांगले उपक्रम याठिकाणी होत आहेत. अशा मोहिमांत नागरिकांचा सहभाग वाढवण्याबरोबरच अन्य महत्वपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या वतीने विविध घेण्यात येत आहेत. अमृतमहोत्सवी दौड, सायकल रॅली, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही वेगवेगळ्या कार्यक्रम घेण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रास्ताविकातून दिली. अखेरीस पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी आभार मानले.
संजीवन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी, शिक्षकांच्या सहभागासह बिंदू चौकात खास कार्यक्रम
कोल्हापूरच्या बिंदू चौकात संजीवन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खास कार्यक्रम सादर केला. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग या महापुरुषांची वेशभूषा करून जनजागृती केली. तसेच या कार्यक्रमात उस्फुर्तपणे शिक्षकांनी देशभक्तीपर गीते ही सादर करून वातावरणात वेगळीच रंगत आणली .
वर्सोवा एज्युकेशन ट्रस्टच्या SVWA हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये तिरंगा उत्सव
मुंबईतील वर्सोवा एज्युकेशन ट्रस्टच्या SVWA हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि श्रीमती कमला मेहता कॉलेजमध्ये तिरंगा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मेजर डॉ. आश्लेषा अशोक तावडे-केळकर होत्या. व्हीईटीचे अध्यक्ष अरुण देव यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमात ट्रस्टचे सदस्य राजन चंडोक, डॉ.क्षितिज मेहता, ममता थोरात यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष तिवारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा तलवार उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप केले आणि त्यांचा सैन्यातील अनुभवही सांगितला आणि विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित केले.
मुक्तपीठच्या गुड न्यूज बातमीपत्रात आज मोजक्या काही कार्यक्रमांचा आढावा घेतला आहे. तुम्ही सभोताली पाहाल तर सर्वत्र वातावरण तिरंगामय झालेलं अनुभवाल. ह्रदयातून उमटतील शब्द…जय हिंद!