मुक्तपीठ टीम
संपूर्ण राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या सहा-सात दिवसांपासून संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत ३७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आत्महत्या न करण्याचे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसेच राज्य सरकार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
तुटेपर्यंत ताणण्यात काहीही अर्थ नसतो
- प्रत्येक वेळी माझेच खरे अशी भूमीका घेऊन चालत नाही.
- राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची जाणीव आहे.
- त्यामुळे त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न सरकार करेल.
- राज्य सरकारने तोट्यात असलेल्या महामंडळाला दीड हजार कोटींची मदत केली आहे.
- एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे.
- आधीच तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला दिवसाकाठी १२ कोटी रुपयांचा फटका बसत आहे.
- त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा.
- तुटेपर्यंत ताणण्यात काहीही अर्थ नसतो हे कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावे.
राज्य सरकार कायम एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी
- एअर इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी विमान कंपनी होती.
- ती तोट्यात गेली तिला विकण्याचा निर्णय केंद्राने घेतला.
- आपल्या एसटीला ६० वर्षांची परंपरा आहे.
- गेल्या ६० वर्षांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेली, परंतु एसटी महामंडळ तोट्यात असताना देखील कोणी खासगीकरणाचा साधा विचार देखील केला नाही.
- राज्य सरकार कायम एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे.
आत्महत्या न करण्याचे आवाहन
- आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. मी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आत्महत्या करू नये.
- सरकार जर दोन पाऊले मागे येत असेल, तर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील काही बाबींमध्ये माघार घेऊन सरकारला सहकार्य करावे.