मुक्तपीठ टीम
मराठवाड्यातील जिल्हे वेगानं कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहेत. त्यातही औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होत असल्यानं स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यात अनलॉक धोरण राबवले आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील पुरातन स्थळांना पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहेत.
आज सकाळी ६ पासून अजिंठा, वेरूळ लेण्यांसह महत्वाची जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा या पर्यटन स्थळी पर्यटकांची रिघ सुरु होईल आणि स्थानिकांचे व्यवसायही बहरतील.
औरंगाबाद जिल्ह्यासाठी पर्यटन क्षेत्र हे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील पुरतान लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. मात्र कोरोना साथीमुळे पर्यटनावर वाईट परिणाम झाला. अनेक पर्यटनस्थळी शुकशुकाट पसरला होता. आता मात्र हे चित्र बदलेल.
गेल्या महिन्यापासून औरंगाबाद शहरातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने कमी झाली. त्याचबरोबर आता ग्रामीण भागही कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील निर्बध शिथिल केले होते. त्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या कमीच होत असल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पर्यटकांना कसा असणार प्रवेश?
• जिल्हा प्रशासनाने १७ जून रोजी सकाळी सहा वाजेपासून जिल्ह्यातील अजिंठा वेरूळ, बिबीका मकबरा, दौलताबाद किल्ला ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
• या पर्यटनस्थळांवर सकाळच्या सत्रात १००० आणि दुपारच्या सत्रात १००० पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
• पर्यटकांना या ठिकाणी भेट देत असताना कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
• पर्यटन स्थळे खुली करण्यात आली असली तरी धार्मिक स्थळे मात्र तूर्तास बंदच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.