मुक्तपीठ टीम
उजनी धरणातील पाणी बारामती, इंदापूरला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून या निर्णयाला प्रचंड विरोध होत आहे. रविवारपासून जिल्ह्यात आंदोलन करण्यात आली आहे. दत्ता भरणे सोलापूरचे पालकमंत्री असून प्रत्यक्षात इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी सोलापूरवर अन्याय केल्याचा आरोप सोलापूरकरांकडून केला जात आहे. रविवारी पंढरपुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले तर सोमवारी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात आरती करून या सरकारला सद्बुद्धी येवो अशी प्रार्थना करण्यात आली.
पुन्हा एकदा पाणीप्रश्न पेटला!
- इंदापूर आणि बारामती येथील जवळपास १७ गावांसाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.
- याच निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आणि राजकीय संघटना आक्रमक झाल्या आहेत.
- मागच्या वर्षी देखील लाकडी निंबोडी प्रकल्प मंजुरीसाठी प्रयत्न सुरू असताना सोलापुरातील स्थानिक नेत्यांनी त्याला विरोध केला होता.
- मात्र आता या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याने पुन्हा एकदा पाणीप्रश्न पेटत आहे.
या योजनेस सोलापूरकरांचा विरोध!!
- इंदापूर आणि बारामती तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
- उजनी धरणातील पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदापूर आणि बारामती तालुक्यातील एकूण १७ गावासाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे.
- या सिंचन योजनेमुळे ७३५० हेक्टर अवर्षण प्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.
- यासाठी जवळपास ०.९० अब्ज घनफूट पाणी उपसा करणे प्रस्तावित आहे.
- या योजनेसाठी ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
- मात्र या योजनेस सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि राजकीय लोकांचा विरोध आहे.