मुक्तपीठ टीम
सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींची सहा पदे रिक्त असून सरन्यायाधीश यू यू लळीत८ नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात एकूण सात पदं रिक्त होतील. एवढंच, नाही तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पदं लवकर भरली गेली नाहीत, तर न्यायाधीशांच्या निवृत्तीमुळे पुढील सहा महिन्यांत आणखी तीन पदे रिक्त होतील, त्यामुळे रिक्त पदांची एकूण संख्या दहावर जाईल. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्याची शिफारस सरकारकडे पाठवली आहे.
न्यायाधीशांची रिक्त पदं लवकर भरली नाहीत, तर येत्या सहा महिन्यांत आणखी तीन पदे रिक्त होणार!
- सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण मंजूर पदे ३४ आहेत.
- सध्या सर्वोच्च न्यायालयात २८ न्यायाधीश कार्यरत असून सहा पदे रिक्त आहेत.
- सीजेआय यू यू लळीत ८ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती ललित यांच्या निवृत्तीनंतर रिक्त पदांची संख्या सात होणार आहे.
- लळीत यांच्यानंतर ४ जानेवारी रोजी न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर निवृत्त होणार आहेत.
- त्यानंतर मे महिन्यात आणखी दोन न्यायमूर्ती न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी १४ मे आणि न्यायमूर्ती एमआर शहा १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस यापूर्वीच करण्यात आली आहे. पुढील महिन्यात, तीन न्यायाधीश न्यायमूर्ती केएम जोसेफ १६ जून, न्यायमूर्ती अजय रस्तोगी १७ जून आणि न्यायमूर्ती व्ही. राम सुब्रमण्यम २९ जून रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर ८ जुलै रोजी न्यायमूर्ती कृष्णा मुरारी निवृत्त होणार आहेत. तोपर्यंत नवीन न्यायाधीशांची नियुक्ती न झाल्यास सर्वोच्च न्यायालयातील रिक्त पदांची संख्या १४वर जाईल.
आणखी काही न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया मध्येच अडकली.
याशिवाय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची रिक्त पदे लक्षात घेऊन सीजेआय यू यू लळीत यांनी आणखी काही न्यायाधीशांच्या लवकर नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली होती, परंतु तो प्रयत्न मध्येच अडकला.