मुक्तपीठ टीम
लॉकडाऊननंतर पुन:श्च हरीओम केल्यानंतर सामान्यांची आर्थिक बाबतीतली रुळावरुन घसरलेली गाडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे सामान्यांचा खिसा रिकामाच होत आहे. स्वयंपाकाचा गॅस महागला, डाळी महागल्या, भाज्यांच्या किंमतीही कडाडल्या, त्यात आता गाड्यांचा सीएनजीही महागणार असल्याची माहिती मिळत आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत ७६ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. याचा परिणाम थेट सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींवरही होणार आहे.
देशातल्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत. आता दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरात ऑक्टोबरमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीही वाढण्याचे संकेत दिले गेले आहेत.
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) सारख्या कंपन्या दर ६ महिन्यांनी किंमतींचा आढावा घेतात. आता १ ऑक्टोबरला आढावा घेतला जाणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबर २०२१ पासून ३१ मार्च २०२२ पर्यंत दर ३.१५ डॉलर प्रति युनिट होऊ शकतात. हाच दर सध्या १.७९ डॉलर प्रति युनिट इतका आहे. नैसर्गिक गॅस हा एक कच्चा माल आहे. हा गॅस सीएनजी आणि स्वयंपाकाच्या गॅससाठी पीएनजीमध्ये रुपांतरीत केला जातो. पीटीआयच्या माहितीनुसार महानगरांमध्ये गॅस वितरणात १० ते ११ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.