मुक्तपीठ टीम
एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त झालेल्या पंजाबमधील विजयाने आम आदमी पार्टी म्हणजेच आपचा उत्साह चांगलाच दुणावला आहे. आप आता राष्ट्रीय पार्टी बनण्याच्या तयारीत असून ती कॉंग्रेसची जागा घेणार,असा दावा आपचे नेते राघव चढ्ढा यांनी केला आहे. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर १० मार्चनंतर आपची देशातील दोन राज्यांमध्ये सत्ता असेल.
पंजाब विधानसभेतील निवडणूकीच्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळत असल्याचा अंदाज दाखवण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांनी सांगितलं की, आप राष्ट्रीय पातळीवरील पक्ष बनण्यास सज्ज आहे. आप कॉंग्रेसची जागा घेईल. एक्झिट पोलचे निकाल सांगतात की पंजाबच्या जनतेने परिवर्तनासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. लोकांनी पारंपारिक पक्षांना नापंसती दर्शवलेली आहे. आप ही एक राष्ट्रीय आणि वेगाने वाढत चाललेल राजकीय पार्टी आहे.
अनेक निवडणूक एक्झिट पोल्सनुसार पंजाबमध्ये आपच्या सत्तेची भविष्यवाणी करण्यात आली आहे. जर एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले तर यावेळी पहिल्यांदाच आप पंजाबमध्ये सरकार स्थापन करेल. आपने पंजाबात भागवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.
एक्झिट पोल्सचा पंजाबात आपला कौल
- एक्झिट पोल्सनुसार पंजाबात आपला किमान ७० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- सोमवारी राज्यातील सर्व टप्प्यातले मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या एजंसींनी एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त केले.
- आपनंततर कॉंग्रेस, अकाली दल आणि भाजपाला जागा मिळण्याचा अंदाज आहे.