मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वच पक्षांकडून टीका केली जात आहे. याआधीही कोश्यारी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राज्यपालांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले असले तरी भाजपा त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्यपालांचं विधान वैयक्तिक असून आम्ही त्यांच्याशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
- नाशिक जिल्ह्यातील मालेगावातून पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं विधान वैयक्तिक असून आम्ही त्यांच्याशी सहमत नाही.
- मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचं योगदान नाकारता येणार नाही, मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलं.
- बाळासाहेबांचं योगदानही सर्वश्रुत आहे.
- मराठी माणसामुळे मुंबईला वैभव, लौकिक प्राप्त झाला. उपमुख्यमंत्र्यांनीही भूमिका केली, राज्यपालांनी खुलासा दिला आहे.
- राज्यपाल हे घटनेतील मोठं पद आहे.
- ते राज्याचं मोठं व्यक्तिमत्त्व आहे.
- त्यामुळे राज्यपालांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी.
शिंदे गटाला राज्यपालांचं म्हणणं बिलकुल मान्य नाही!!
- मराठी माणसाच्या मेहनतीवर मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली.
- मुंबईत मराठी माणसाने अस्मिता जपली, त्यामुळे मराठी माणसाच्या अस्मितेशी कोणालाही अवहेलना करता येणार नाही.
- आमची स्पष्ट भूमिका हीच आहे, की मराठी माणसाचं योगदान नाकारता येणार नाही.
- इतर राज्यातील, समाजातील लोकही इथे व्यापार व्यवसाय करतात.
- मात्र मुंबईत जे पोटेंशियल आहे, त्याचं श्रेय इतर कोणाला घेता येणार नाही.
- मुंबईच्या अस्मितेला कोणाला धक्का लावता येणार नाही.
- शिवसेना कायम मराठी माणसासोबत राहिली आहे.
- शिवसेना प्रमुख कायम मुंबईकरांसोबत राहिले आहेत.
- शिवसेना म्हणून आम्हाला राज्यपालांचं म्हणणं बिलकुल मान्य नाही, आम्ही सहमत नाही.
राज्यपाल काय म्हणाले होते?
कधी कधी लोकांना मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये विशेषत: मुंबई आणि ठाणेमधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना इथून काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत.
मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.