अॅड. असीम सरोदे / व्हा अभिव्यक्त!
परिवर्तन व सामाजिक बदल यासाठी मनात आस, भेडसावणाऱ्या प्रश्नांचे उत्तर बनण्याचा प्रयत्न करण्याची उर्मी माझ्यात भरणारे माझे बाबा – बाळासाहेब सरोदे माझे खरे शिक्षक. आपल्या कामाच्या ठिकाणी अन्याय सहन करीत आणि त्या अन्यायाला उत्तर देतांना त्रास देणारेच स्वतःचा (खोटा) मोठेपणा आचरटपणे प्रस्थापित करीत असतांना नाउमेद न होता त्यांना पुरून उरलेली माझी आई माझी गुरू आहेच. प्रत्येकाची आई ही गुरुच असते कारण ती हजार जबाबदाऱ्या सांभाळून घर उभे करते.
त्याचवेळी ‘ मी कोनाचा गुरू नाही, माह्या कोनी चेला नाही ‘ असे म्हणणारे संत गाडगे महाराज मला जवळचे वाटले. हे वाक्य म्हणायला मोठे धाडस व त्याचवेळी स्वतःच्या विवेकनिष्ठ विचारांवर प्रचंड आत्मविश्वास पाहिजे असे मला जाणवले. शाळेत जाऊन मिळणारे शिक्षणच नाही तर जीवनशिक्षण महत्वाचे असते हे गाडगेमहराजांचे खरा शिक्षक असल्याचे लक्षण मग मी शाळेतल्या शिक्षकांमध्ये शोधत राहिलो.
सामाजिक न्यायासाठी वकिली करतांना मग चेहरा नसलेले अनेक जण माझे शिक्षक होत गेले. कधी एचआयव्ही सह जगणारे, कधी कारागृहातील कैदी, कधी वेश्यावस्तीतील स्त्रिया, कधी अनाथालयातील मुले व वृद्धाश्रमात राहणारे ज्येष्ठ नागरिक तर कधी वंचित, भटक्या समाजातील लोक, कधी बेघर व शहरी गरीब, कधी समलिंगी व्यक्तीसमूह तर कधी कौटुंबिक हिंसा सहन करणाऱ्या स्त्रिया व कायद्याच्या अत्याचाराचे बळी, शेतकरी, कधी नद्या, पर्वत, जंगले या सगळ्यांनी माझ्या शिक्षणाभूतीत भर घातली व हे झाले माझे अनेक शिक्षक. त्या सगळ्यांचे आजच्या शिक्षकदिनानिमित्त मनःपूर्वक आभार.
कोरोना काळात शाळेत व कॉलेजमध्ये जाऊनच शिक्षण घ्यायचे या संकल्पनेला जबरदस्त तडाखा बसलेला आहे. शाळा व कॉलेजच्या भिंतींमधील शिक्षणावर अवलंबून असलेल्या समाजाला शाळा बंद असल्याने एक पिढीच हरवून जाण्याची भीती आहे अश्या वेळी शिक्षण कोण देणार आणि शिक्षक कोण असणार? निर्जीव मोबाईल, टीव्ही, अँप्स, गुगलसर्च इंजिन यांनाच मुलांनी शिक्षक मानण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या शिक्षकदिनी खरे जीवन-शिक्षण, तसे अनुभव देणारी जिवंत माणसे यांचा विचार शिक्षक म्हणून झाला पाहिजे, शिक्षक बदलले पाहिजे, शिक्षण प्रक्रिया बदलली पाहिजे.
माझ्या बाबांनी हा प्रयत्न केला. पेरूच्या झाडाखाली, वडाच्या व रिठ्याच्या झाडाखाली भरणाऱ्या वर्गांमध्ये मी शिकलो आहे. बाबांच्या प्रयत्नात काही जणांनी मीठ कालवले व माझ्या बाबांना चांगलाच ‘धडा’ शिकवला. पण तरीही ते उभे राहिले तसे लोकशिक्षक शोधावे लागतील. अनेकजण आहेत. तेव्हा मग साजरा होईल खरा शिक्षकदिन!