मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडीचे लोक हेच स्वतः तुकडे तुकडे गँग आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे काय? तर तुटून उरलेली शिवसेना, तुटून आलेली काँग्रेस, तुटून आलेली राष्ट्रवादी आहे. पहिला तुकडा मूळ काँग्रेसमधून तुटून आलेला काँग्रेस (आय) दुसरा तुकडा काँग्रेसमधून तुटून आलेली राष्ट्रवादी काँग्रेस तर तिसरा तुकडा वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून तुटून आलेली उद्धवजी यांची शिवसेना आहे. त्यांना अजून तुकडे हवेत. याला बघ त्याला बघ अन् महापालिका जिंक असं चालू असून तुकडे तुकडे गॅंग मुंबईची शकलं करणार आहेत अशी घणाघाती टीका करत भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
जागर मुंबईचा अभियानांतर्गत २५ वी जाहीर सभा विले पार्ले विधानसभेत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे रविवारी पार पडली. या सभेला माजी नगरसेविका ज्योती अळवणी, सुशम सावंत, वीरेंद्र म्हात्रे, राजेश मेहता, स्वप्ना म्हात्रे, सुनीता मेहता, अनिष मकवाणी, अभिजित सामंत, प्रकाश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मतासाठी मराठी – मुस्लिम तुष्टीकरण आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, मतासाठी कुर्निसात घालणं हे भाजपाला मान्य नाही. कोरोना काळात मुंबईकरांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना याकूब मेमन थडग सुशोभीकरण केले जाते. उद्धव ठाकरे दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज्याकडे पुरावे मागितले जातात. औरंगजेबाचे स्वप्न उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले. असुरांचा नाश करण्यासाठी हा जागर आहे. हा जागर सत्तेसाठी नाही. समाजात तेढ निर्माण होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल ॲड. आशिष शेलार यांनी केला. ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक टेंडरमध्ये पैसे खाण्याचे काम केले. प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मतं मागण्याचा कार्यक्रम हा अजेंडा उद्धव यांच्या शिवसेनेचा आहे. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. हिंदू मराठी आणि मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. हिंदुत फूट पाडण्याचे काम सुरू आहे ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिला.
मूषक संहार घोटाळा
पैसा खाण्याची स्पर्धा ठेवली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पहिला नंबर मिळेल. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कचऱ्यात खाल्ले, नाल्यात खाल्ले. पालिकेत उंदीर मारण्यात घोटाळा झाला. पाच वार्डात उंदीर मारले खर्च झाला एक कोटी. किती मारले? कुठे पुरले? नोंद कुठे केली? फाईल दाखवा तर म्हणतात पुरात वाहून गेली? वाघ म्हणता उंदरात पण खाता? यांनी २५ वर्षांत २ लाख करोड रुपयांचा घोटाळा केला अशी टीका आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.
खा. पूनम महाजन म्हणाल्या, सर्वसामान्यांच्या पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी एकूणच हा जागर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आहे. रामसेतुला काँग्रेसने विरोध केला. राहुल गांधी यांनी मातेच्या मागे उभा राहून आपले राजकारण चालवले आता सीतामातेचा वापर करून राजकारण केले जात आहे. राहुल गांधी चुनावी हिंदू असल्याची टीका खा. पुनम महाजन यांनी केली.
आ. पराग अळवणी म्हणाले, मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. या अभियानाच्या माध्यमातून विरोधकांचा भ्रष्टाचार जनतेपर्यंत पोहोचवला जात आहे. त्यामुळे विरोधक गोंधळून गेले आहेत. त्यावरून विषयांतर व्हावं यासाठी रोज प्रयत्न केला जात आहे. रस्ते, नाले सफाईत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कारवाई झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचा अजेंडा पुन्हा बनला याचा आम्हाला आनंद आहे असेही ते म्हणाले.