मुक्तपीठ टीम
बनावट पनीर कारखान्यांवरील धाडीचे प्रकरण ताजे असतानाच आता चहाशौकिनांसाठी धक्कादायक बातमी आहे. मुंबईत पोलिसांनी घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त चहा पावडरचा साठा आणि रंग जप्त करण्यात आले आहेत.
शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला माहिती विभागाने दिली आहे. या चहामुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असतात. त्यामुळे ही भेसळ कशी ओळखावी ते जाणून घेणं महत्वाचं आहे.
शिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे शिवडीच्या रामगड हटमेंटमधील आर एम ट्रेडर्सची त्यांनी तपासणी केली. तेथे त्यांना चहा पावडर या अन्नपदार्थास खाद्यरंग लावून विक्रीसाठी साठा केला असल्याचे आढळले. तसेच खाद्यरंग आढळून आला. हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तेथून चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेण्यात आले. तसेच उर्वरित ४२९ किलोग्रॅमचा चहा पावडरचा साठा किंमत ८५ हजार २४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
संबंधित हजर व्यक्ती , पेढीमालक यांचे विरुद्ध शिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त म.ना.चौधरी, सहाय्यक आयुक्त एस.एस.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ल.सो.सावळे आणि र.ज.जेकटे केली आहे.
अशी ओळखावी भेसळ…
- चहामधील भेसळ कशी ओळखावी, याबाबतची माहिती फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) ट्विटद्वारे करून दिली आहे.
- सर्वप्रथम एक फिल्टर पेपर घ्यायचा.
- चहाची पावडर त्या फिल्टर पेपरवर पसरवून ठेवावी.
- त्यावर थोडे पाणी शिंपडावं, जेणेकरून फिल्टर पेपर ओला होईल.
- त्यानंतर फिल्टर पेपर पाण्याने धुवा.
- या पेपरला चहा पावडरचा गडद डाग पडल्यास चहा पावडरमध्ये भेसळ असेल आणि जर पेपरला डाग पडला नाही किंवा ईगदी दलका डाग पडला तर त्यात भेसळ नाही हे सिद्ध होईल.
भेसळयुक्त चहा पावडरचे आरोग्यावर परिणाम!
- भेसळयुक्त चहा प्यायल्याने तोंडाची चव खराब होते.
- तसेच आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होत असतात.
- यामुळे यकृताचे विकार होतात.
- आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.