मुक्तपीठ टीम
पनीर हा तसा आपल्या सर्वांचा आवडतं. विशेषत: शाकाहारींसाठी प्रथिनांची गरज भागवणारा रुचकर पदार्थ म्हणून पनीरची मागणी जास्तच. पण आरोग्यासाठी आवडीनं ताव मारल्या जाणाऱ्या पनीरबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई परिसरात रोज हजारो किलो बनावट पनीर विकलं जात आहे. मुंबईमध्ये भेसळयुक्त पनीरची विक्री करणाऱ्या दोन कारखान्यांवर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली. तिथे २,१३१ किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. हे कारखाने दररोज किमान दोन हजार किलो बनावट पनीर मुंबईत पुरवत असत.
बनावट पनीरचा आरोग्यविघातक काळाधंदा
- मुंबई शहरात चालू असलेल्या बेकायदेशीर व अवैध धंद्यांवर बेधडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
- त्या अनुषंगाने सी.बी. कंट्रोल आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई या कक्षास गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की, चेंबूर पोलीस ठाणेच्या हद्दीतील काही डेअरी मालकांकडून आरोग्यास अपायकारक अशा पनीरची विक्री करण्यात येत आहे.
- त्याप्रमाणे प्राप्त माहितीची शहानिशा करण्यासाठी ०६ मे रोजी डॉ. सी.जी.रोड, चेंबूर कॅम्प या परिसरात सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलीस पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्यासह डेअरीवर छापा टाकला.
- यादरम्यान पोलिसांनी चेंबूरमध्ये एक टेम्पो ताब्यात घेतला आणि एकूण १,३८,८२० रुपयांचे ६३१ किलो बनावट पनीर जप्त केलं होतं.
बनावट पनीरच्या टेम्पोनंतर काळा धंदा उघड
- त्यांनी पनीरचे नमुने घेतले, घेऊन तपासणीसाठी पाठवले.
- त्या टेम्पोमधून ते चेंबूर येथील एका डेअरीत नेले जाणार होते.
- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मार्फतीने उपरोक्त नमुद पनीरच्या नमुन्यांची तपासणी केली असता, सदरचे पनीर हे आरोग्यास अपायकारक हलक्या दर्जाचे असल्याचे आढळून आल्याबाबत १० मे रोजी लेखी अहवाल प्राप्त झाला.
- त्यावरून सदर डेअरीचे मालक तसेच त्यांना भेसळयुक्त पनीर पुरवठा करणाऱ्या मे. यशोदा ऑरंगनिक फुड प्रा. लि. , बदलापूर, जि. ठाणे व मे. दिशा डेअरी, भिवंडी, जि. ठाणे या कारखान्यांच्या मालकांविरुध्द चेंबुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
भिवंडी, नवी मुंबई आणि बदलापूरमध्ये तीन कारखान्यावर धाडी
- सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सी. बी. कंट्रोलने चार वेगवेगळी पोलीस पथके तयार केली.
- या पथकांनी बदलापूरच्या यशोदा ऑरगॅनिक फुड प्रा. लि. आणि नवी मुंबई, भिवंडीमधील दिशा डेअरीच्या कारखान्यांवर धाडी घातल्या.
कसे बनवतात बनावट पनीर?
- तिथे पनीर बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे पाम ऑईलने भरलेले ९५ डबे, ३० पोती दुध पावडर व इतर रसायने आणि १५०० किलो तयार भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले.
- सदर आरोपी हे दुध न वापरता दुधाची पावडर, हलक्या प्रतीचे पाम तेल व केमिकल्सचा वापर करून त्यावर प्रक्रिया करून खाण्यासाठी अपायकारक व हलक्या दर्जाचे पनीर तयार करून ते मुंबईमधील रेस्टॉरंट, हॉटेल्स, तसेच डेअरी व्यावसायिक व केटरींग व्यावसायिकांना “मलाईयुक्त पनीर” या नावाने स्वस्त दरात विक्री करत होते.
त्याचप्रमाणे सदर गुन्ह्यात नमुद कारखान्यांचे मालक तसेच डेअरी पंजाबचे मालक अशा एकुण ०७ आरोपी अटक करण्यात आले आहेत. अटक आरोपींना न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता ०५ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा तपास सी.बी.कंट्रोल, आ.गु.वि. या कक्षा मार्फत करण्यात येत आहे. सदरची कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे प्रविण पडवळ, पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे -२ महेंद्र पंडित, यांच्या मार्गदर्शनाखाली सी.बी. कंट्रोलचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, स.पो.नि. रोहित सांवत, स.पो.नि. रूपेश दरेकर, पो.ह. गणेश डोईफोडे, महेश नाईक, पो.ना. महेंद दरेकर, संतोष पवार, शेखर भंडारी, पोलीस अंमलदार नितीन मगर, भरत खारवी, रविंद्र कुंभार, रोहन शेंडगे सी.बी. कंट्रोल, आ.गु.वि., मुंबई या कक्षाकडून करण्यात आली. आॅल इंडिया फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन’चे (एएफडीएलएचएफ) महाराष्ट्रचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडेय यांनी याबाबतची तक्रार केली होती.