मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राचे ध्वजाधिकारी म्हणून (फ्लॅग आॅफिसर कमांडिंग महाराष्ट्र नेव्हल एरिया-फोमा) रिअर अॅडमिरल संदीप मेहता यांनी गुरुवारी, १६ डिसेंबर रोजी येथे पदभार स्वीकारला. कुलाबा येथील ‘आयएनएस कुंजाली’ या हेलिकॉप्टर तळावर त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांना ‘गार्ड आॅफ आॅनर ’ सन्मान देण्यात आला. यावेळी औपचारिक परेड करण्यात आली.
मेहता यांची कार्यकारी (एक्झिक्युटीव्ह) शाखेत १ जानेवारी १९८९ रोजी नियुक्ती झाली. ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आणि महू येथील ‘आर्मी वॉर कॉलेज’ येथून पदवीधर झाले आहेत. ध्वजपदी पदोन्नती होण्यापूर्वी ते वॉशिंग्टन (डीसी) येथील भारतीय दूतावासात संरक्षण आणि नौदल ‘अॅटॅची’ म्हणून राजनैतिक नेमणुकीवर होते.
त्यांची शैक्षणिक पात्रता अत्युच्च आहे. ‘नॉटिकल सायन्स ’ आणि ‘ टॅक्टिकल आॅपरेशन्स’ मध्ये पदव्युत्तर पदवी, संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यासातील ‘एम फिल’ पदवी आणि व्यवस्थापन अभ्यास यातही त्यांनी पदव्युत्तर पदविका मिळवली आहे.
विशिष्ट सेवा पदक प्राप्त केलेल्या मेहता यांच्या नौदल कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या मुख्यालयांमध्ये (कमांड ) नियुक्त्या झाल्या आहेत. किनारपट्टीवरील माइनस्वीपर, आयएनएस अलेप्पी, लँडिंग शिप टँक आयएनएस गुलदार आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस दिल्ली यांचा समावेश आहे. त्यांनी सुकन्या आणि ज्योती नौैकांचे दिशादर्शन (नेव्हिगेटिंग) अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या प्रारंभीच्या नेमणुकांमध्ये रणविजय, शार्दुल, चपळ आणि विभूती या भारतीय नौैकांवरील कार्यकाल आणि ‘आयएनएस किर्च’ या कॉर्व्हेटचे ‘कमिशनिंग’ कार्यकारी (एक्झिक्युटिव्ह) अधिकारी याचाही समावेश आहे.
त्यांच्या महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये कमांड आॅपरेशन्स आॅफिसर, एनएव्हीसीसी येथे मुख्य कर्मचारी अधिकारी, अधिकारी अणि नौसैनिकांच्या विविध कारवाया केल्या जाणा-या नौदल संचालन संचालनालयातही सहसंचालक, दिल्लीतील नौदल मुख्यालयातील नौदल योजना संचालनालयात संचालक आणि मुख्य कर्मचारी अधिकारी (आॅपरेशन्स) यांचाही समावेश होतो. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयातंर्गत महाराष्ट्राचे ध्वजाधिकारी म्हणून सध्याची नेमणूक स्वीकारण्यापूर्वी ते वेलिंग्टन येथे संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय (डीएसएससी) येथे मुख्य प्रशिक्षक (नौदल ) होते.