मुक्तपीठ टीम
टीव्हीसमोर होम मिनिस्टर लागल्यावर आदेश बांदेकर यांना पाहून ते समोर असल्याची कल्पना करुन गाणं म्हणणाऱ्या नलिनी जोशी या ९९ वर्षीय आजीची आज त्यांनी सांगलीत भेट घेतली.
निमित्त होते आजीच्या शंभर वर्षातील पदार्पण कार्यक्रमाचे. यावेळी आदेश बांदेकर यांनासमोर पाहून आजीही अवाक् झाल्या. आदेश बांदेकर यांनी आजींना पैठणी भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
काही दिवसांपूर्वी आजीच्या गाण्याचा व्हिडीओ पाहून आदेश बांदेकर यांनी त्यांचं कौतुक करण्यासाठी सांगलीला येण्याचं आश्वासन दिलं होतं. वय वर्ष ९९ असताना सुद्धा सांगलीच्या नलिनी जोशी यांनी गाण्याची गोडी जपली आहे. नाट्यगीते भक्तिगीते, भावगीते जोशी आजी अतिशय सुरेल आवाजात म्हणून दाखवतात.
या वयातही नाट्यगीत, भक्तिगीत आणि भावगीत सुरेल आवाजात म्हणणाऱ्या आजी संध्याकाळ झाली आणि बांदेकर टीव्हीवर झळकले की गाणं गायला सुरु करतात. जणू काही मागील काही वर्षांपासून त्याचा हा दिनक्रमच बनला आहे. सांगलीतील या आजीबाईंचं अनोखं प्रेम पाहून आदेश बांदेकर यांनी थेट सांगली गाठत त्यांची भेट घेतली. साक्षात आदेश बांदेकर यांना पाहून आजींना आश्चर्य वाटलंच, शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आणि समाधान झळकलं. यावेळी आदेश बांदेकर यांच्या गळ्यात पडून आजीबाईंनी आपला आनंद व्यक्त केला.
दरम्यान, सांगलीतील नलिनी जोशी यांनी आज वयाची ९९ वर्षे पूर्ण करत १०० व्या वर्षात पदार्पण केलं. या कार्यक्रमाला आदेश बांदेकर यांनी उपस्थिती लावत त्यांना पैठणी भेट देत मनसोक्त गप्पाही मारल्या. यावेळी बोलताना आदेश बांदेकर यांना त्यांच्या आईची आठवण आली आणि या आठवणीने बांदेकर यांचे डोळे पाणावल्याने संपूर्ण वातावरण गहिवरुन गेले.
‘झी’ मराठीवर २००४ साली होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. या कार्यक्रमाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमाचे साडेपाच हजार भाग झाले आहेत. आदेश बांदेकर वहिनींना मानाची पैठणी देऊन सन्मान करतात. आता या शोमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नावापासून पैठणीपर्यंत सर्वंच नवीन आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना गृहिणींना ११ लाखांची पैठणी मिळवण्याची संधी आहे. शिवाय कार्यक्रमाचं नाव होम मिनिस्टरऐवजी ‘महा मिनिस्टर’ आहे