मुक्तपीठ टीम
भारत आणि आशिया खंडातील दुसऱ्या नंबरचे श्रीमंत बिजनेसमॅन गौतम अदानींना मोठा धक्का बसला आहे. नॅशनल सिक्युरिटी डिपॉजिटरी लिमिटेड (National Securities Depository Ltd) ने अदानी समुहात गुंतवणूक करणाऱ्या ३ परदेशी फंडची खाती गोठवली आहेत. यात अल्बुला इन्वेस्टमेंट, क्रेस्टा आणि एपीएसएस इन्वेस्टमेंट फंड्सच्या खात्यांचा समावेश आहे. यामुळे या तीन फंड कंपन्यांना अदानी ग्रुपच्या ४ कंपन्यांच्या ४३ हजार ५०० कोटींहून अधिक किंमत असलेल्या शेअर्समध्ये आता व्यवहार करता येणार नाही. समावेश आहे. NSDL च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही खाती ३१ मे पर्यंत गोठवली गेली आहेत.
या तिन्ही खात्यांमधून अदानी एन्टरप्रायजेजमध्ये ६.८२ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ८.०३ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५.९२ टक्के आणि अदानी ग्रीडमध्ये ३.५८ टक्के भागीदारी आहे. कस्टोडियन बँका, आणि परदेशी गुंतवणुकीचा कारभार सांभाळणाऱ्या कायदेशीर संस्थांनुसार या विदेशी फंड्सनी फायदेशीर मालकीबाबत (Beneficial ownership) संपूर्ण आणि स्पष्ट माहिती पुरवलेली नाही. या कारणामुळे त्यांची खाती गोठवली गेली असावीत. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (PMLA) नुसार कायदेशीर मालकीसंदर्भात संपूर्ण माहिती देणं आवश्यक आहे.
खाती गोठवली म्हणजे काय केलं?
- खात्यांचे परिरक्षक त्यांच्या ग्राहकांना कारवाईसंदर्भातली सूचना देतात.
- मात्र फंड्सचा व्यवहार करणाऱ्यांकडून यासंदर्भातली माहिती दिली गेली नाही तर खाती गोठवली जाऊ शकतात.
- याचा अर्थ यास्थितीत फंड्सची खरेदी विक्री करता येणार नाही.
- अदानींच्या या प्रकरणात NSDL, SEBI आणि अदानींच्या ग्रुपला पाठवलेल्या ईमेलला माहिती स्वरुपात सहकार्य केलं गेलं नाही.
- अल्बुला इन्वेस्टमेंट, क्रेस्टा आणि APMS इन्वेस्टमेंट फंड्ससोबतही संपर्क होऊ शकला नाही.
- सेबीकडे या तिनही फंड्सची परदेशी गुंतवणूकदार म्हणून नोंद आहे. मॉरिशसमधून त्यांचं कामकाज चालतं.
- या तिन्ही गुंतवणुकदारांचा पत्ता पोर्ट लुई शहरातील आहे.
तसंच त्यांची कोणतीही वेबसाईट नाही. - या तिन्ही गुंतवणूकदारांना २०२० पर्यंत नियमांचं पालन करण्यासंदर्भातल्या सूचना केल्या गेल्या होत्या.
- नवीन नियमांचं पालन न करणाऱ्या फंड्सची खाती गोठवली जातील, असंही सेबीने स्पष्ट केलं होतं.
- सेबीच्या नव्या नियमांनुसार FPI ला फंड्सच्या मालकीसंदर्भात आणि फंड मॅनेजर्सची खासगी माहिती देणं बंधनकारक होतं.
सेबीकडून अदानी समुहाच्या शेअर्समधील तेजीचीही चौकशी
- सेबी अदानी ग्रुपच्या शेअर्सच्या किंमतींचीही चौकशी करत आहे.
- गेल्या वर्षभरात या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २०० ते १००० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
- सेबीने याप्रकरणाचीही २०२० पासून चौकशी सुरु केली आहे.
- शेअर्सच्या किंमतींवरुनही सुरु झालेल्या चौकशीला अदानी ग्रुपकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.