मुक्तपीठ टीम
नैना प्रकल्पाकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नैना प्रकल्पातील २३ गावांच्या मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम विकास आराखड्याची अंमलबजावणी सिडकोतर्फे करण्यात येत आहे. त्यानुसार प्रारुप नगर रचना परियोजना क्र. ४, ५, ६ आणि ७ तयार करण्याचा इरादा महाराष्ट्र शासन राजपत्रासोबतच स्थानिक वर्तमानपत्रांतदेखील जाहीर करण्यात आला होता. सदर प्रारुप योजनांविषयी काही सूचना व हरकती असल्यास, जमीन मालकांनी सिडकोच्या नैना कार्यालयात सादर करण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत
आहे.
या प्रस्तावाचा भाग म्हणून प्रारुप नगर रचना परियोजना क्र. १,२ आणि ३ ला शासनाने मंजुरी दिली आहे. प्रारुप नगर रचना परियोजना क्र. ४,५,६ आणि ७ तयार करण्याचा इरादा अनुक्रमे दिनांक २१ जून २०१९, २६ जून २०१९, ८ ऑगस्ट २०१९ व १८ सप्टेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आला होता. सदर योजना प्रसिद्ध करण्यासंबंधीची सूचना दि. २५ एप्रिल २०२२ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रांमध्येही याबाबतची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परियोजनांचे सविस्तर नकाशे, अहवाल आणि नियमावली फॉर्म क्र. १ व २ जमीन मालकांना पाहण्याकरिता नैना कार्यालय, ७वा मजला, टॉवर क्र. १०, सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक संकुल तसेच सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सिडकोच्या संकेतस्थळावर परियोजनांचा तपशील हा पुढील अनुक्रमांकां (अ.क्र.) पुढे उपलब्ध आहे.
- प्रारुप परीयोजना क्रमांक—४ सिडकोच्या संकेत स्थळावरील नैना येथील मराठी अनुक्रमांक ९१ वर असून इंग्रजी अनुक्रमांक ९३ वर उपलब्ध आहे.
- प्रारुप परीयोजना क्रमांक—५ सिडकोच्या संकेत स्थळावरील नैना येथील मराठी अनुक्रमांक ९२ वर असून इंग्रजी अनुक्रमांक ९४ वर उपलब्ध आहे.
- प्रारुप परीयोजना क्रमांक—६ सिडकोच्या संकेत स्थळावरील नैना येथील मराठी अनुक्रमांक ९३ वर असून इंग्रजी अनुक्रमांक ९५ वर उपलब्ध आहे. प्रारुप परीयोजना क्रमांक—७ सिडकोच्या संकेत स्थळावरील नैना येथील मराठी अनुक्रमांक ९४ वर असून
इंग्रजी अनुक्रमांक ९६ वर उपलब्ध आहे. सदर सुचना स्थानिक वृत्तपत्रात सुध्दा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
तरी संबंधित जमीन मालकांनी मूळ जमिनीचा आकार व त्यांना देऊ करण्यात आलेले अंतिम भूखंडाचे क्षेत्र यांमध्ये काही तफावत आढळल्यास, तसेच उपरोक्त प्रारुप योजनांविषयी काही सूचना व हरकती असल्यास, प्रारुप योजना प्रसिद्ध करण्यासंबंधीची सूचना वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सिडकोच्या नैना कार्यालयात ७/१२ आणि गटबुकासह सादर कराव्यात, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. ग्राह्य सूचनांच्या अनुषंगाने उपरोक्त प्रारुप परियोजना राज्य शासनाच्या मंजुरीस्तव सादर करण्यात येणार आहेत.