मक्तपीठ टीम
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या जलद मार्गावरही एसी लोकल सुरु करण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी पत्रकारांना दिली.
सध्या सीएसएमटी ते कल्याण या धीम्या मार्गावर तसेच हार्बर, ट्रान्स हार्बरवर एसी लोकल सेवा दिली जात आहे. परंतू हार्बर, ट्रान्स हार्बरवर या लोकलला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान नवीन दोन मार्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर अल्प प्रतिसाद मिळणारी लोकल सेवा या नव्या मार्गावर वळवण्याचा विचार आहे, असे लाहोटी म्हणाले. या लोकल सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावर चालवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या सेवा नव्या मार्गावर चालवल्यास त्याला प्रतिसाद मिळू शकेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांपासून मेल व एक्स्प्रेस गाड्या स्वतंत्र मार्गाने जातात. मात्र लोकलचे वेळापत्रकही वेळेवर असलेच पाहिजे, अशी प्रवाशांची ब-याच वर्षांपासून मागणी होती. मध्य रेल्वे प्रशासाने प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते दिवा पाचवा, सहाव्या मार्गाच्या कामांना गती दिली आहे. मार्च २०२२ पर्यंत ही नवीन रेल्वे मार्गिका पूर्णत्वास जाणार आहे.
जानेवारी ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत २४ ते ७२ तासांचे ब्लॉक पाचव्या आणि सहाव्या मार्गांवरील विविध कामे पूर्ण करण्याकरीता येत्या जानेवारी ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत २४ ते ७२ तासांचे ब्लॉक घेतले जाणार आहेत. त्याची पूर्वतयारी मध्य रेल्वेने सुरु केली आहे. येत्या २ जानेवारी २०२२ मध्ये २४ तासांचा, त्यानंतर ३६ तासांचा ब्लॉक होणार आहे, असे रेल्वे सुत्रांकडून कळते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ७२ तासांचा मेगाब्लॉक असेल. त्याचा जास्त फटका असंख्य लोकल फे-यांसह मेल, एक्स्प्रेसना बसून त्या रद्द करण्यात येतील. नव्या २ मार्गिका उपलब्ध झाल्यावर सीएसएमटी ते कल्याण,खोपोली, कसारा मार्गावर जास्तीत जास्त ८० लोकल फे-या वाढणार आहेत, असे अनिल कुमार लाहोटी यांनी म्हणाले. मात्र या फे-या वातानुकूलित असतील. ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मागार्साठी गेल्या रविवारी १८ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता.