मुक्तपीठ टीम
देशातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रविवारी रस्ते अपघातात निधन झाले. पोलिसांच्या प्राथमिक तपास अहवालात ते प्रवास करत असलेली कार डिव्हायडरला धडकण्यापूर्वी भरधाव वेगात होती. मिस्त्री मर्सिडीज-बेंझ जीएलसी सारख्या एसयूव्हीमधून जात होते, ७० लाख रुपयांची ही कार सुरक्षेच्या सर्व व्यवस्थेसह येते. तरीही हा मृत्यू कसा झाला असावा यावर चर्चा सुरू आहे. त्यात मागील सीटवर बसलेल्या सायरस आणि त्यांच्या मित्राने बेल्ट लावले नव्हते, त्यामुळे पुढील सीटवर असलेल्यांचे बेल्टमुळे एअर बॅग उघडल्याने जीव वाचले, पण मागील सीटवरील दोधांचेही बळी गेले. तसेच पालघरमधून जाणाऱ्या महामार्गावरील धोकादायक जागांचाही मुद्दा आता चर्चेत आला आहे. तसेच पालघर जिल्ह्यात जिल्हा रुग्णालये नसल्याने नेहमीच अपघात तेथे झाला तरी जखमींना शेजारच्या गुजरात राज्यात न्यावे लागते. यावेही सायरस मिस्त्रींच्या अपघातग्रस्त गाडीतील दोन जखमींना उपचारासाठी गुजरातमधील वापीच्या रुग्णालयात नेण्यात आलं.
अतिवेग
- मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पांडोले कार चालवत होत्या.
- कार डावीकडून दुसर्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती परंतु नियंत्रण सुटले.
- सूर्या नदीवरील पुलावरील डिव्हायडरवर कार भरधाव वेगात आदळली.
- पालघरमधील चारोटी चेकपोस्ट ओलांडल्यानंतर त्यांच्या कारने अवघ्या काही मिनिटांमध्ये २० किमीचे अंतर पार केले होते.
- पोलिसांचे म्हणणे आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची कार दुपारी २.२१ च्या सुमारास पोस्टाजवळ दिसत आहे.
- चेकपोस्टपासून २० किमी अंतरावर असलेल्या सूर्या नदीवरील पुलावर काही वेळातच हा अपघात झाला.
सीट बेल्ट टाळले, ते दगावले!
- अपघातानंतर सायरस मिस्त्री यांना रुग्णालयात नेले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जहांगीर दिनशा पंडोले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- सायरस आणि जहांगीर कारच्या मागच्या सीटवर बसले होते. मोटार वाहन कायद्यानुसार सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे. दोघांनीही सीट बेल्ट लावला नव्हता.
- सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि जहांगीर पंडोले याच्या डाव्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली.
- अपघातात सायरस यांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच तर जहांगीर यांचा दाखल झाल्यावर लगेच मृत्यू ओढवला.
- अपघातानंतरच्या मर्सिडीजच्या फोटोवरून असे दिसून येते की कारच्या मागील भागाला इजा झाली नाही. तरीही सीटबेल्ट लावलेला नसल्याने ते जोरात आदळले असावेत, त्यांच्या एअरबॅगही उघडल्या नाहीत आणि त्या इजेने त्यांचे प्राण गेले असण्याची शक्यता आहे.
सीट बेल्ट वापरले, ते वाचले!
- अनाहिता आणि तिचा नवरा डॅरियस दोघेही पुढे बसले होते. दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पंडोले आणि डॅरियस पंडोले पती-पत्नी आहेत.
- समोरच्या सीटवर बसलेल्या दोघांचेही प्राण एअरबॅगमुळे वाचले असे मानले जात आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर २९ धोक्याच्या जागा! तीनच्या दोन लेन्सचा गोंधळ!!
- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्यातील चारोटी येथे हा अपघात झाला.
- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात आणि त्यात मृत्यू ओढवणे नेहमीचे झाले आहे.
- सीमेवरील अछाड ते घोडबंदर या ११८ किलोमीटरच्या पट्ट्यात २९ धोकादायक जागा आहेत.
- या ठिकाणी वारंवार असे अपघात घडत आहेत.
- गेल्या वर्षभरात साधारणत: चारशेच्या आसपास बळी गेल्याची माहिती ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट युनियनचे प्रवक्ते हरबंस सिंह नन्नाडे यांनी दिली आहे.
- चारोटीचा उड्डाणपूल उतरताना उतारामुळे वाहनांचा वेग वाढलेला असतो.
- हा पूल उतरताना तीन लेन आहेत, मात्र पुढे त्या दोन लेनमध्ये बदलतात. त्यामुळे वाहनचालक गोंधळून जातात.
- या पुलानंतर थेट सूर्य नदीच्या पुलाचा कठडा बाहेर निघालेला आहे.
- अनेकदा गोंधळलेल्या वाहनचालकांच्या गाडीची त्या कठड्याला धडक बसते. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघातही अशाच प्रकारे झाला आहे.
- याआधीही तेथेच अशा प्रकारे अपघात झाले आहेत, काहींचे बळीही गेले आहेत.
पालघरमध्ये चांगलं रुग्णालय नसल्यानं गुजरातमध्ये उपचार!
- अपघातानंतर अनाहिता आणि तिचा नवरा डॅरियस यांच्यावर उपचारासाठी गुजरातमधील वापी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
- त्याचं कारण धक्कादायक आहे! पालघर स्वतंत्र जिल्हा होऊन आता १० वर्षे होतील, पण अद्याप तिथं जिल्हा रुग्णालय उभारण्यात आलेलं नाही.
- पालघरमध्ये जिल्हा रुग्णालय नाही, तसेच महामार्गांलगत आवश्यक उपचार सुविधाही नाहीत.
- या महामार्गांवर टोलवसुली होते, पण आवश्यक सुविधायुक्त रुग्णवाहिकाही नाहीत