मोहल्ला क्लिनिकच्या धरतीवर ठाण्यात आपला दवाखाना हे (प्राथमिक उपचार केंद्र )क्लिनिक सुरू झाले. गेल्या दीड वर्षात अवघे पाच क्लिनिक उघडले असताना मात्र गेल्या दीड महिन्यात ती संख्या १९ वर पोहोचली आहे. त्यातच त्या क्लिनिकला ठाणेकर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. तर येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत २५ वे क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन असून मार्च अखेरपर्यंत क्लिनिकची संख्या ५० होईल असा विश्वास आपला दवाखाना आणि वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी व्यक्त केला आहे. त्यातच या वाढत्या प्रतिसादामुळे नगरसेवकांकडून आपापल्या प्रभागात क्लिनिक सुरू करण्यासाठी धडपड सुरू झाल्याने ठामपा आरोग्य विभागाने ज्या- ज्या नगरसेवकांना आपल्या प्रभागात क्लिनिक सुरू करायचे आहे. त्यांनी त्याबाबत महापालिका आयुक्तांकडे मागणी करावी असे स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार, आपला दवाखाना हे क्लिनिक ठाण्यात सुरू झाले. पण, त्याला गेल्या दीड महिन्यांपासून मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभण्यास सुरू झाली आहे. ठाण्यात ५० क्लिनिक सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने परवानगी दिली. त्यातील अवघे पाच क्लिनिक दीड वर्षात सुरू झाले होते. यावरून मोठ्या प्रमाणात टीका सुरू होत होती. आता आपला दवाखाना या क्लिनिकचा कारभार मॅझिक दिल या संस्थेच्या वन रुपी क्लिनिकने हाती घेतला. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यात वन रुपीने रेल्वेतील आपला अनुभव महापालिका कार्यक्षेत्रात कामी आल्याचे दिसत आहे. कमी वेळेत मोठया प्रमाणात क्लिनिक सुरू केल्याने क्लिनिकची ५ वरून संख्या १९ वर गेली आहे. तसेच येत्या ४ फेब्रुवारीला २५ वे क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तर ५० क्लिनिकचे लक्ष्य मार्च अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल असे म्हटले आहे. सध्या ठाण्यातील कोपरी, राबोडी, लोकमान्य नगर, सावरकरनगर, किसननगर इत्यादी ठिकाणी क्लिनिक सुरु असून लवकरच मुंब्र्यात ३, कळव्यात २, दिव्यात ४ ठिकाणी क्लिनिक सुरू होतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
” नगरसेवकांची प्रचंड मागणी आहे. याबाबत प्रशासनाने प्रत्येक प्रभागात परवानगी द्यावी. तसेच सायंकाळी ५ ते १० या वेळेत सध्या सुरु असलेल्या प्रत्येक क्लिनिकमध्ये ७० ते ८० ठाणेकर नागरिक प्राथमिक उपचार घेण्यासाठी येत आहे. तसेच त्यांना तेथे मोफत ही औषध दिले जात आहे.” डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिक यांनी अशी माहिती दिली.
“ठाणे महापालिका प्रशासनाने ठाण्यात ५० आपला दवाखाना सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. त्यानुसार येत्या ४ फेब्रुवारीला २५ वे क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित मार्च अखेरपर्यंत सुरू होतील. जर नगरसेवकांना आपल्या प्रभागात क्लिनिक सुरू व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी आयुक्तांकडे मागणी करावी.” – डॉ. राजू मुरुडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठामपा यांनी असे म्हटले आहे.