मुक्तपीठ टीम
कोरोनाचे संकट असतानाही सर्व प्रशासकीय यंत्रणेने कोरोना नियंत्रणविषयक जबाबदारी सांभाळत माझी वसुंधरा अभियानही यशस्वीरित्या राबविले. आता चालू वर्षातही हे अभियान सर्वांनी प्रभावीपणे राबवून वातावरणीय बदलांचे परिणाम नियंत्रीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानात पुरस्कार मिळविलेल्या पंचायतराज संस्थांचे अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासमवेत मंत्री ठाकरे यांनी नुकताच ऑनलाईन प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. चित्रपट अभिनेते आमीर खान, दिग्दर्शक सत्यजित भटकळ, मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, माझी वसुंधरा अभियान संचालक सुधाकर बोबडे यांच्यासह पुरस्कारविजेते जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आदी या संवादात सहभागी झाले होते.
माझी वसुंधरा पुरस्कार मिळाल्याबद्दल मंत्री ठाकरे यांनी सर्व संबंधीतांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, कोरोनासारखेच वातावरणीय बदल हे सुद्धा गंभीर संकट आहे. याचे परिणाम आता आपल्या दारापर्यंत आले आहेत. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, वादळ ही वारंवार येणारी संकटे हवामान बदलाचेच परिणाम आहेत. मागील वर्षी यासाठी आपण जवळपास साडेतेरा हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली. आता हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी आपल्याला अधिक सजग व्हावे लागेल, असे ते म्हणाले.
मुंबईत कचरा वर्गीकरणाचा प्रयोग यशस्वीरित्या राबविण्यात आला. पुर्वी १० हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होत होता. पण सुका आणि ओला कचरा असे वर्गीकरण सुरु केल्यानंतर कचऱ्याचे प्रमाण साडेसहा हजार मेट्रीक टनवर आले. शहरात मियावाकी वनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येत आहे. सायकल ट्रॅक, सिवेज ट्रीटमेंट, समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतरण, महामार्गांचे हरितीकरण असे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सर्वांच्या सहभागातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येतील, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
माझी वसुंधरा अभियानासाठी योगदान देऊ – आमीर खान
चित्रपट अभिनेते आमीर खान यांनी माझी वसुंधरा अभियानातून हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतूक केले. या अभियानाच्या माध्यमातून अत्यंत मुलभूत अशा प्रश्नावर काम करण्यात येत आहे. वातावरणीय बदलासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन होणे आवश्यक आहे. या विषयावर चित्रपट बनवून त्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करता येईल. यासंदर्भात आपण निश्चित विचार करु. पानी फाऊंडेशनमार्फतही या अभियानात योगदान दिले जाईल. मुंबई शहरात सायकल ट्रॅकच्या वापराला चालना देण्यात यावी, सायकलच्या वापरासाठी आपण चित्रपटसृष्टीतील सर्व घटकांना प्रोत्साहीत करु, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत विविध पर्यावरणपुरक उपक्रम – इक्बालसिंह चहल
मुंबई मनपा आयुक्त चहल यांनी यासंदर्भात शहरात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामुळे शहराला लागणारे पाणी शहरातूनच मिळणार आहे. याद्वारे तलावासाठी होणारी मोठी जंगलतोड, पाईपलाईनसाठी करावा लागणारा भरमसाठ खर्च, या मार्गावर होणारी वृक्षतोड हे सर्व वाचणार आहे. समुद्राच्या पाण्याच्या डिसॅलिनेशलनचा हा प्रकल्प पर्यावरणपुरक आहे. याशिवाय शहरात मियावाकी वनांची निर्मिती, रोड साईड वृक्षारोपण असे विविध पर्यावरणपुरक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याला पर्यावरणसमृद्ध बनवुया – मनिषा म्हैसकर
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी अभियानाच्या पहिल्या टप्पाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, पर्यावरण आणि विकास याचा सुवर्णमध्य साधून पर्यावरणपुरक विकासावर आपल्याला भर द्यावा लागेल. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून आपण याचे एक चांगले उदाहरण सर्वांसमोर ठेवूया. पहिल्या वर्षात या अभियानातून पर्यावरणपुरक अनेक बाबी आपण साध्य केल्या. आता चालू वर्षातही हे अभियान प्रभावीपणे राबवून आपल्या राज्याला पर्यावरणसमृद्ध बनवुया, असे आवाहन त्यांनी केले.