मुक्तपीठ टीम
रासायनिक प्रक्रिया केलेल्या भेसळयुक्त तेलाची विक्री करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी रामजी गौतम आणि रामदुलार पासी या दोघांना पोलिसांनी अटक केली तर त्यांचा मालक नजीर खान आणि रमेश सोनी हे कारवाईची माहिती मिळताच पळून गेले आहेत, त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाने सुमारे अकरा लाख रुपयांचा साडेचौदा हजार लिटरचा काळ्या तेलाचा साठा जप्त केला आहे.
अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना नंतर विनोबा भावे नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मुंबई शहरात काळ्या तेलावर रासायिक प्रक्रिया करुन अशा भेसळयुक्त तेलाची विक्री करणार्या काही टोळ्या आहेत, या टोळ्याविरुद्ध यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केली होती, तरीही त्यांच्या छुप्या कारवाया सुरुच होत्या.
कुर्ला परिसरात अशाच प्रकारे एक टोळी कार्यरत आहे, ही टोळी शहरातील विविध गॅरेजमधून टाकून देण्यात येणारे काळे तेल जमा करुन कुर्ला येथील गोदामामध्ये साठवून ठेवतात, नंतर ते काळे तेल वाडा येथील कारखान्यात पाठविले होते, तिथेच या तेलावर रासायनिक प्रक्रिया करुन अशा भेसळयुक्त तेलाची बाजारात विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती, या माहितीनंतर पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाने शुक्रवारी कुर्ला येथील क्रांतीनगर, बीएमके कंपाऊंडमध्ये छापा टाकला होता, यावेळी तिथे पोलिसांना मोठ्या प्रमाणात काही ड्रममध्ये काळ्या तेलाची साठवणूक केल्याचे दिसून आले.
या कारवाईत पोलिसांनी सत्तरहून अधिक ड्रम आणि आतील साडेचौदा हजार लिटर काळ्या तेलाचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत ११ लाख ३६ हजार ८६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी तिथे असलेल्या रामजी गौतम आणि रामदुलार पासी या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्यांच्या चौकशीत त्यांचा मालक नजीर खान व त्याचा सहकारी रमेश सोनी असून त्यांच्याच सांगण्यावरुन ते तिथे काळे तेल जमा करतात, नंतर ते तेल वाडा येथील कारखान्यात पाठविले जाते, या कारखान्यात या तेलावर रासायनिक प्रक्रिया करुन नंतर अशा भेसळयुक्त तेलाची बाजारात विक्री केली जात असल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलीस शिपाई विशाल यादव यांच्या तक्रारीवरुन विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध २८५, ३३६, ३४ भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, याच गुन्ह्यांत नंतर या दोघांना अटक करुन त्यांचा ताबा संबंधित पोलिसांकडे सोपविण्यात आला. या गुन्ह्यांत नजीर आणि रमेश या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे, कारवाईनंतर ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.