मुक्तपीठ टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओतील स्फोटक प्रकरणासंबंधित राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार यांच्यात नवीन संघर्ष निर्माण झाला. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, यात नक्कीच काळंबेरं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या हवाल्याने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात गुन्हा दाखल का केला नाही, असा प्रश्न विचारला. वाझेंच्या निलंबनाचीही मागणी करण्यात आली आहे. पण एकंदरीतच या प्रकरणात सध्यातरी आघाडी सरकार अडचणीत आल्याचे दिसत आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास एनआयएकडे देण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. पोलीस योग्य तपास करत आहेत. मनसुख हिरेनची केस एटीएस हाताळत आहेत. त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “एटीएस या प्रकरणात लक्ष ठेवत आहे. असे असूनही केंद्राने ते एनआयएकडे दिले तर याचा अर्थ असा आहे की काहीतरी काळंबेरं आहे. हे उघड करेपर्यंत आम्ही हार मानणार नाही.”
आतापर्यंत एटीएसकडून चौकशी करण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या प्रकरणाचा नव्यानं तपास सुरू केला असल्याचे एनआयएने म्हटले आहे. स्फोटक आणि आयईडी / बॉम्ब स्फोटांशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एनआयएला अधिकार देण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित राज्य सरकारच्या संमतीची आवश्यकता नसते, त्यामुळे राज्य सरकार आडकाठी करू शकत नाही.
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह पार्क करण्यात आलेली गाडी आणि संबंधित गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू या दोन्ही घटना सध्या चर्चेत आहेत. या दोन्ही घटनांचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. मात्र ही मागणी अमान्य करत याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) देण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. दरम्यान, अवघ्या तीनच दिवसांत यातील अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास एनआयएकडे देण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले
खासदार डेलकरांचे काय?
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा उल्लेख करत भाजपवर हल्लाबोल केला. त्या प्रकऱणाबद्दल भाजप का बोलत नाही, विद्यमान खासदाराच्या आत्महत्येबद्दल भाजप नेते गप्प का? असा भडिमार त्यांनी केला.