मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात जे काही घडलं ते सत्ताधाऱ्यांच्या प्रेरणेनेच होतं, तुळशीदास भोईटे यांनी आपल्या ‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ या पुस्तकात पक्षांतर, कायदे, नियम, निर्णय, निकाल सारं चांगलं मांडलं असल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचं कौतुक केलं. हे पुस्तक इंग्रजीतही आलं पाहिजे. तुळशीदास भोईटेंनी इंग्रजीत भाषांतर करावं, ते देशभर जावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे पुस्तक देशात एका नव्या विचारप्रक्रियेला चालना देईल असंही ते म्हणाले. तसंच राजकारणात येणाऱ्या तरुणांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मुंबईतील नवे भाषण खळबळजनक ठरत आहे. तुळशीदास भोईटे यांच्या लोकशाही,संविधान आणि पक्षांतर या पुस्तकाचे प्रकाशन आणि मुक्तपीठ सन्मान समारंभात राजकीय टोलेबाजी झाली. त्याच कार्यक्रमातील भाषणात चव्हाण यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले, खळबळजनक विधानं केली. भारतात संसद, विधानसभा ही सभागृहं नपुंसक होतात, असा धक्कादायक दावाही त्यांनी केला. तसंच पक्षांतरबंदी कायदे त्वरित कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याची त्यांची मागणी खळबळ माजवणारी ठरली. त्याचबरोबर भारतातील राजकीय पक्षांमध्ये पक्षांतर्गत लोकशाही नसते हे त्यांचं विधान काँग्रेस पक्षासाठीही अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे. त्याचं कारण ते विधान करताना त्यांनी थेट कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नसलं तरी टाळलेलंही नाही. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी याआधी केलेल्या गौप्यस्फोटांचा पृथ्वीराज चव्हाण यांनी पुनरुच्चार केला.
भारतात लोकशाही नाही, असं सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या पंधरा वर्षांपेक्षाही जास्त संसदीय अनुभवांची आठवण करुन देत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की एकदा लोकसभेतील खासदारांनी पंतप्रधान आणि विधानसभेतील आमदारांनी मुख्यमंत्री निवडला की संसद आणि विधिमंडळाचं महत्व राहत नाही. त्यांना कुणी महत्व देत नाही. संसद आणि विधिमंडळ नपुंसक बनते. पक्षांतरबंदी कायदे काहीच कामाचे राहिलेले नाहीत.
गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसप्रवेशाविषयीच्या गौप्यस्फोटाचा पृथ्वीराज चव्हाण यांनी पुनरुच्चार केला. सोनिया गांधी यांनी मान्यता दिली, पण केंद्रीय मंत्रिपद देत प्रवेश घडवण्याला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी विरोध केला. आपण एकप्रकारे पक्षांतरासाठी लाच देतो, असं वाटणार नाही का, असा प्रश्न आपल्याला केला. त्याची आजही खंत असल्याचं चव्हाण म्हणाले. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा प्रवेश थांबला. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले, असेही ते म्हणाले. पण तत्कालीन पंतप्रधानांच्या नैतिक भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.
तुळशीदास भोईटे यांच्या लोकशाही,संविधान आणि पक्षांतर या पुस्तकाचे प्रकाशन आणि मुक्तपीठ सन्मान समारंभात राजकीय टोलेबाजी रंगली. मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी ज्येष्ठ पत्रकार, मुक्तपीठ या व्ह्युज चॅनेलचे संपादक तुळशीदास भोईटे यांच्या लोकशाही, संविधान आणि पक्षांतर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. संविधान हा पुस्तकाचा आत्मा असं लेखक तुळशीदास भोईटे यांनी मनोगतात म्हटलं, त्याचा प्रत्यक्ष प्रकाशन समारंभाच्या सुरुवातीपासूनच आला. समारंभाची सुरुवात कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक, कलाकार कबिर नाईकनवरे यांनी सहा भाषांमध्ये रचलेल्या संविधान उद्देशिकेनं झाली.
मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र, मा. श्री. प्रमोद कोदे, निवृत्त न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय, मा. श्री. डॉ. नरेंद्र जाधव, अर्थतज्ज्ञ, माजी सल्लागार IMF, नियोजन आयोग, माजी खासदार, लेखक, मा. श्री. ज्ञानेश महाराव, ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, मा. श्री. संजीव खांडेकर, विचारवंत, लेखक, कवी, कलाकार, मा. श्री. सुदेश हिंगलासपूरकर, विश्वस्त, ग्रंथाली, मा. श्री. संदीप चव्हाण, अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार, मा. श्री. सिद्धार्थ मोकळे, मुख्य प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी या मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन आणि मुक्तपीठ सन्मान पुरस्कार देण्यात आले.
यावेळी प्रिंट, डिजीटल, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधल्या विविध विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा मुक्तपीठ सन्मानाने गौरवण्यात आलं. या मान्यवरांमध्ये आजतकचे सिनिअर अँकर आणि मुंबईतकचे संपादक साहिल जोशी यांना सर्वोत्तम नॅशनल अँकर – सर्वोत्तम संपादक डिजिटल, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांना सर्वोत्तम संपादिका टीव्ही – सर्वोत्तम अँकर स्पेशल शो आणि दैनिक लोकमतचे यदु जोशी यांना सर्वोत्तम राजकीय संपादक म्हणून गौरवण्यात आलं. (#मुक्तपीठसन्मान #muktpeethsanman पुरस्कार समारंभाबद्दल सर्वांच्या नावांसह शनिवारी नक्की वाचा)
लोकशाही,संविधान आणि पक्षांतरया पुस्तकाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मा. अभय ओक यांची प्रस्तावना लाभली आहे. आज पक्षांतर आणि पक्षचोरी सरास सुरु आहे. संविधानाची तमा न बाळगता, सत्तेच्या गैरवापरातून वाट्टेल ते होत असल्याचं चित्र समाजात आहे. त्यावर निवडणूकआयोग, न्यायालय आणि राज्यपाल, अध्यक्षांचे अधिकार यावर खल सुरू आहे. याचा लोकशाही प्रणालीवर दूरगामी परिणाम होणार आहे. या सार्याचा परामर्श घेणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकात पक्षांतराता इतिहास, सर्व कायदे, महत्वाचे न्यायालयीन निकाल, निवडणूक आयोग, विधानसभा, लोकसभा अध्यक्ष यांचे निर्णय हे देत त्यापैकी काही महत्वाच्या निकाल, निर्णयांची संवैधानिक कसोटीवर तपासणी करुन सोप्या मराठीत हे सर्व मांडलं आहे. पक्षांतराचा काळा इतिहास, आता सुरु झालेली पक्षचोरी, महाराष्ट्रावर जास्त भर देत देशभरातली अशी प्रकरणं,
याआधी झालेल्या घटना, संविधानाची माहिती, अधिकार, कर्तव्य, पक्षांतरविरोधी कायद्याचं दहावं परिशिष्ट, त्यात झालेले बदल, १९५१चा लोकप्रतिनिधत्व कायदा, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि मर्यादा, गैरवापर, १९६८ निवडणूक चिन्ह आदेश काय सांगतो?, विधानसभा, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा विधानपरिषद सभापती यांचे अधिकार आणि त्यांच्या मर्यादा, गैरवापर, आजवर पक्षांतराच्या, पक्षावरील ताब्याबद्दलच्या प्रकरणांमधील निवडणूक आयोग, न्यायालय यांचे महत्वाचे निकाल, महाराष्ट्रातील सर्व निर्णय, निकाल कसे होते ते स्पष्ट करणारं त्यांचं सरळस्पष्ट विश्लेषण, कायदे, नियम, निर्णय़ सांगत समजवत भाष्य, ही या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
हे पुस्तक सवलतीच्या दरात संपूर्ण देशभरात टपालखर्चासह २५० रुपयात उपलब्ध आहे.
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अँकर राजेंद्र हुंजे यांनी त्यांच्या शैलीत प्रकाशन आणि मुक्तपीठ सन्मान समारंभाचे सूत्रसंचालन केले. या पुस्तकाचे संपादक अरुण जोशी आहेत. मुखपृष्ठ निलेश जाधव यांनी साकारलं आहे. तर ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजिका धनश्री धारप यांचंही सहकार्य मोलाचं ठरलं. कार्यक्रमाच्या आयोजनात अॅड. जयेश वाणी, डॉ. विजय कदम, डॉ. राहुल रनाळकर, वृषाली यादव सारंग, आशुतोष रापतवार, पंकज दळवी, विक्रांत शिंदे, डॉ. गणेश गोळेकर, संदीप कांबळे, अॅड. राजेश टेकाळे, संदीप भुजबळ, सुश्रुषा जाधव, रोहिणी ठोंबरे, अजय माने यांचा सहभाग महत्वाचा होता.
नक्की पाहा:
https://www.youtube.com/live/gTaHtJ5mM0Q?si=RKFIRs4_1mbmWu1I







Subscribe