मुक्तपीठ टीम
केंद्रातील मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतरही शेतकरी माघारीसाठी तयार नाहीत. शनिवारी १००व्या दिवशी शेतकर्यांनी द्रुतगती मार्गासह दिल्लीकडे जाणारा मार्ग रोखण्यात आला होता. सुमारे पाच तास एक्स्प्रेस वे जाम झाला.
शेतकरी आंदोलनाच्या आजच्या १०१व्या दिवशीही आंदोलक ठाम असून कृषी कायदे मागे घ्या आणि किमान हमी दराला कायदेशीर दर्जा द्या, या मागणीसाठी ते आग्रही आहेत. सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचेही शेतकरी नेत्यांनी सांगितले, पण चर्चा करण्यासाठी कोणतीही अट नसावी असे ते म्हणाले.
शेतकरी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन अधिक तीव्र करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने ९ मार्च रोजी बैठक बोलावली आहे. शेतकरी सरकारशी चर्चा करण्यास नेहमी तयार असतात. लोकशाहीतील कोणत्याही समस्येचे निराकरण वाटाघाटीतून होईल. परंतु, सत्तेत असलेल्यांनी शेतकरी नेत्यांना औपचारिक आमंत्रण पाठवावे, जसे पूर्वीच्या चर्चेदरम्यान केले गेले होते. सरकारच्या सशर्त वाटाघाटीमुळे प्रश्न सुटणार नाहीत.
दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाशी संबंधित शेतकऱ्यांनी – सिंघू सीमा, टिकारी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डर – संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत नाकाबंदी केली. पलवलमध्ये केएमपी एक्स्प्रेस वे रोखतत शेतकर्यांनी लोकगीते गात आपला निषेध नोंदविला. यावेळी, शांततापूर्ण मार्गाने धरणे चालू होते. हे पाहता सर्व सीमावर्ती भागात सुरक्षा वाढविण्यात आली.