मुक्तपीठ टीम
मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच, सर्वांमध्ये मराठीतून संवाद करण्याची रुची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता “मराठी तितुका मेळवावा” या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत एक विश्व संमेलन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया (NSCI) येथे दि. ४ ते ६ जानेवारी, २०२३ या कालावधीत हे विश्वसंमेलन होणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
मंत्रालयातील वार्ताहर कक्षात मंत्री दीपक केसरकर यांनी “मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकारांशी आज संवाद साधला.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, हे संमेलन म्हणजे मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी परंपरा यांचा वैश्विक पातळीवर होणारा भव्य दिव्य उत्सव असणार आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि एकूणच मराठीवर प्रेम करणाऱ्या, महाराष्ट्राबाहेर असणा-या सर्व मराठी भाषिकांनी या संमेलनाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहनही मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील अन्य विभागाचे मंत्री तसेच केंद्रीय मंत्री हे संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाच्या निमित्ताने विविध उद्योग महाराष्ट्रामध्ये यावेत याकरिता गुंतवणूकदार व उद्योजक यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे मराठी उद्योजक व गुंतवणूकदार यांचा परस्पर संवाद सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहित मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
जगभरातील विविध देशांमध्ये तसेच विविध राज्यांमध्ये वास्तव्य करत असणाऱ्या मराठी भाषिकांनी एकमेकांमध्ये संवाद साधावा, विचारांचे व कल्पनांचे आदान – प्रदान व्हावे. सक्षम, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून वैश्विक मराठी व्यासपीठ मिळेल. लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती यांचे सादरीकरण तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्ष घेणे हा सुध्दा या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये लेझीम, ढोल, ताशांसारखे मराठी पारंपरिक खेळ, नाटक, लावणी, लोकसंगीत आदी मराठी पारंपरिक मनोरंजन, ग्रंथ प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल अशी मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे. संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्व मराठी संमेलनात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची विस्तृत माहिती मराठी तितुका मेळवावा https://www.marathititukamelvava.com या संकेतस्थळावर पाहता येईल आणि संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी या संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी 91 9309462627 आणि 91 9673998600 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करता येईल.
संमेलनातील कार्यक्रमाची रूपरेषा
संमेलनाच्या तीनही दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी ४ जानेवारी रोजी लेझीम पथक, ढोलताशा पथक, मर्दानी खेळ यांच्या साथीने संमेलनाचे उदघाटन होणार आहे. उपस्थित मंत्री महोदय, मान्यवर मंडळी आणि निमंत्रितांचं स्वागत मराठमोळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या सत्रात नचिकेत देसाई, केतकी भावे – जोशी, माधुरी करमरकर, मंगेश बोरगावकर, श्रीरंग भावे हे गायक कलाकार काही अजरामर मराठी गाणी सादर करतील. त्यानंतर रंग कलेचे हा वंदना गुप्ते, नीना कुळकर्णी, शिवाजी साटम, अशोक पत्की अशा सिने-नाट्य सृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होणार आहेत.तसेच लेखिका संजीवनी खेर, प्रकाशक हर्ष भटकळ, लेखक ऋषिकेश गुप्ते या साहित्यिकांच्या सहभागात मराठी भाषा काल आज उद्या हा परिसंवाद होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे या परिसंवाद सत्राच्या अध्यक्ष असून याप्रसंगी त्या साहित्याविषयी आपल मनोगत व्यक्त करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे करणार आहे.
दुपारच्या सत्रात १० विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा मराठमोळा फॅशन शो होणार आहे. यात लेखिका, पटकथाकार मनीषा कोरडे, भाषा तज्ञ अमृता जोशी, झी स्टुडियोच्या क्रिएटिव्ह हेड वैष्णवी कानविंदे, क्रीडा प्रशिक्षक नीता ताटके, दिग्दर्शिका समृद्धी पोरे, लँडस्केप डिझायनर असीम गोकर्ण, अॅड. दिव्या चव्हाण, व्यावसायिक सुप्रिया बडवे, चित्रकार शुभांगी सामंत, पहिली कॅमेरा वूमन अपर्णा धर्माधिकारी या मान्यवर महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन अभिनेत्री समिधा गुरु करणार आहे. संध्याकाळी लोकसंगीताचा कार्यक्रम होईल ज्यात नंदेश उमप, गणेश चंदनशिवे, उर्मिला धनगर, वैशाली भैसने माडे हे कलाकार असतील व त्यानंतर चला हसुया या विनोदी कार्यक्रमाचं सादारीकरण होईल. या कार्यक्रमात चला हवा येऊ द्या फेम सर्व कलाकारांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात स्वर अमृताचा ही मराठी भावगीत, भक्तीगीत आणि नाट्यसंगीताची मैफल सादर होणार आहे. यात ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, आशा खाडिलकर आणि उत्तरा केळकर हे दिग्गज सहभागी असणार आहेत. त्यानंतर मराठी पाऊल पडते पुढे हे परिसंवाद सत्र होईल. या सत्रात चितळे डेरीचे गिरीश चितळे आणि हावरे इंजिनिअर्स आणि बिल्डर्सच्या उज्ज्वला हावरे हे भारतातील २ नामवंत उद्योजक आणि “जर्मनीतील ओंकार कलवडे, सॅनफ्रान्सिस्कोतील प्रकाश भालेराव हे भारताबाहेरील २ उद्योजक सहभागी होतील. तसेच विविध क्षेत्रात आकाशझेप घेतलेल्या आणि मराठी माणूस हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे हे दाखवून देणाऱ्या काही मराठी मान्यवरांच्या मुलाखती होणार आहेत. या कार्यक्रमात BMM अध्यक्ष संदीप दिक्षित, पूर्णब्रम्हच्या जयंती कठाळे, सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अॅड गुरु भरत दाभोलकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहेत.
दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ‘साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर विविध लोकवाद्यांची मैफल, वाद्यमहोत्सव महाताल सादर होईल. तसंच रसिकांना आपल्या चिंता विसरून हास्याच्या विश्वात नेणारे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार काही विनोदी प्रहसन सादर करणार आहेत. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन दिप्ती भागवत करणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात कृष्णा मुसळे आणि निलेश परब यांची अनोखी वाद्य जुगलबंदी सादर होणार आहे. तसंच २०० ते २५० कलाकारांच्या साथीने महासंस्कृती लोकोत्सव हा भव्य कार्यक्रम सादर होणार आहे.
संमेलनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात पारंपरिक वारकरी संप्रदायाचं दर्शन घडवणाऱ्या वारकरी दिंडीने होईल. त्यांनतर मराठी खाद्यसंस्कृती लोकांसमोर यावी आपले विविध पारंपरिक पदार्थ उपस्थितांना पाहता यावे या दृष्टीने एक पाककला स्पर्धा पार पडणार आहे. यानंतर इन्व्हेस्टर मीट हे अगदी महत्त्वपूर्ण सत्र पार पडणार आहे. भारतातील आणि भारताबाहेरील उद्योजक यावेळी एकत्र येणार आहेत आणि उद्योग क्षेत्राची प्रगती, गुंतवणुकीच्या संधी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या सत्रात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री अशा अनेक मान्यवरांचा सहभाग असणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आलेल्या सर्व उद्योजकांशी आणि गुंतवणूकदारांशी विशेष संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रात आनंदयात्री हा कविता वाचन, अभिवाचन आणि गाण्यांचा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमातून प्रसिद्ध कलाकार ऐश्वर्या नारकर, पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे मराठी साहित्यातील काही अजरामर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करतील तर सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी गाजलेली मराठी गाणी सादर करतील. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक करणार आहेत.
यानंतर गप्पाष्टक हा मुलाखतीचा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात नेमबाज अंजली भागवत, सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने, चित्रकार सुहास बहुळकर, लेखक आणि आयटी तज्ञ अच्युत गोडबोले सहभागी होणार आहेत. तसंच सोनाली कुलकर्णी आणि संस्कृती बालगुडे या सुप्रसिद्ध अभिनेत्रींचा लावणीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं नृत्यदिग्दर्शन मयूर वैद्य यांनी केलं आहे. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे करणार आहे.