मुक्तपीठ टीम
एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) ने चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याज दरासंबंधित एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. संघटनेने व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नसून मागील वर्षाप्रमाणे यंदाही ८.५० टक्के व्याज दिला जाणार आहे. ईपीएफच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या श्रीनगर येथे झालेल्या बैठक हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना संकटात केंद्र सरकारच्या उत्पनात घट झाली होती. तसेच या काळात अनेक कर्मचाऱ्यांनी पीएफ फंडातून मोठी रक्कम काढली होती. त्यामुळे ‘पीएफ’वरील व्याजदराला कात्री लागण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच ८.५० टक्के व्याज दर कायम ठेवल्याने जवळपास सहा कोटी पीएफ सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी मार्चच्या सुरुवातीस, ईपीएफओने व्याजदर कमी करून ८.५० टक्के केले होता. सात वर्षातील हा सर्वात कमी व्याज दर ठरला. यापूर्वी ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ग्राहकांना दोन हप्त्यांमध्ये ८.५० टक्के व्याज देण्याचे मंडळाने नमूद केले होते. त्यातील एक हिस्सा ८.१५ टक्के आणि दुसरा ०.३५ टक्के चा होता.
गेल्या एका वर्षाच्या कालावधीत दोन कोटी पीएफ सभासदांनी पीएफ फंडातून ७३००० कोटी काढले होते. त्यात २०२१ च्शया पहिल्या तीन महिन्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनाशी लढताना पैशांची चणचण भासू नये यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या होत्या. त्यापैकी भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीएफमधील योगदान तीन महिन्यांसाठी १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणून कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक वेतन यावे अशी सोय केली होती.
व्याज दरात असे झाले बदल..
- २०१६-१७ मध्ये आपल्या सभासदांना ८.६५ टक्के सन २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के व्याज दिले होते.
- २०१५-१६ मध्ये व्याजदर ८.८ टक्क्यांपेक्षा थोडी जास्त होती.
- तसेच २०१३-१४ सोबत २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के व्याज दर दिला होता.