मुक्तपीठ टीम
वाढवण बंदर हे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. या बंदराचा विकास करतांना स्थानिक मच्छिमार, शेतकरी यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक तो निधी व यंत्रणा उपलब्ध करुन देण्याबरोबरच स्थानिकांचे सर्व प्रश्न चर्चेतून सोडविणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले.
वाढवण (जि. पालघर) बंदरात स्थानिक शेतकरी व मच्छिमारांचा विरोध होत असल्याबाबत सदस्य कपिल पाटील, सचिन अहिर, विलास पोतनीस आणि सुनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणामार्फत वाढवण बंदर हे मोठे बंदर म्हणून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पर्यावरण अभ्यास, मासेमारीवरील परिणाम आदी संदर्भात जेएपीएमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण यांचा निर्णय लक्षात घेऊन बंदर प्रकल्पाबाबत योग्य तो निर्णय घेण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. मासेमारी करण्याकरीता अत्याधुनिक फिशिंग हार्बर तयार करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. याव्यतिरिक्त मच्छिमारांसाठी विशेष योजना राबविण्यात येतील. या योजनांच्या माध्यमातून मच्छिमारांना अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच मासेमारी वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सदस्य सर्वश्री जयंत पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.