मुक्तपीठ टीम
येत्या नवीन वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत जगातील सर्व श्रीमंत आणि राजकीय वर्तुळातील काही मान्यवर सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस या शहरात दरवर्षी ही बैठक आयोजित केली जाते. ही बैठक १६ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह १००हून अधिक भारतीय मान्यवर या बैठकीत सहभागी होणार आहेत असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांची या बैठकीत सामील होण्याची ही पहिलीच वेळ असेल. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार की नाही हे निश्चित झालेले नाही. यापूर्वी मोदींनी २०१८च्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत भाग घेतला होता. तर, २०२१ आणि २०२२मध्ये, कोरोना संसर्गामुळे बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले गेले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला ‘हे’ भारतीयही लावणार हजेरी!
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, स्मृती इराणी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सर्व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे.
- याशिवाय उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, आदर पूनावाला, सज्जन जिंदाल, एन चंद्रशेखरन, नादिर गोदरेज, राजन आणि सुनील मित्तल, संजीव बजाज आणि सुदर्शन वेणू, नंदन निलेकणी, बायजू रवींद्रन आणि विजयी शेखर शर्मा हे ही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
- तसेच, G20 शेर्पा अमिताभ कांत देखील सहभागी होऊ शकतात.
या संमेलनाला उपस्थित राहणारे जगातील श्रीमंत आणि राजकीय वर्तुळातील व्यक्तींची अंतिम यादी अजून निश्चित झालेली नाही. मात्र, ५०हून अधिक सरकार आणि राज्य प्रमुख सहभागी होतील.