मुक्तपीठ टीम
सध्या वाहन उद्योग क्षेत्रात प्रगती होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाहन विक्री आणि नोंदणीत वाढ होताना दिसत आहे. कोरोना महामारीनंतर, नवीन उत्सर्जन आणि सुरक्षितता मानकांमुळे वाढत्या खर्च आणि व्याजदरांना न जुमानता भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने २०२३मध्ये शाश्वत वाढीची गती कायम राखणे अपेक्षित आहे. २०२२ हे वर्ष भारतीय ऑटोमोबाईल उद्योगासाठी उत्कृष्ट ठरले आहे. परंतु, दुचाकींच्या विक्रीत वर्षभरात फारशी वाढ झालेली नाही.
वाहन उद्योगाच्या मते, यावर्षी प्रवासी वाहनांची विक्री सुमारे ३८ लाख युनिट्सपर्यंत पोहोचू शकते. तीनचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या विभागातही गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली आहे. पुढील वर्षीही ही गती कायम ठेवण्यास वाहन उत्पादक उत्सुक असतील. मिळालेल्या माहितीनुसार, २०२३मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यातही मोठी भर पडेल. २०२२ मध्ये विशेषत: दुचाकी विभागात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली आहे.
वाहन विक्री क्षेत्रातील प्रगतीसह किंमतीतही होणार वाढ!
- नवीन वर्षात वाहन खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी ही बातमी चांगली नसेल. याचे कारण, पुढील वर्षी वाहनांच्या किंमतीही वाढणार आहेत.
- १ एप्रिल २०२३ पासून, वाहन निर्माते उत्सर्जनाच्या नियमांशी जुळवून घेण्याचा आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा खर्च खरेदीदारांना करावा लागेल.
- मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि ह्युंडाईसारख्या अनेक कंपन्यांनी आधीच सांगितले आहे की, ते जानेवारीपासून किंमती वाढवणार आहेत.
मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर.सी. भार्गव म्हणाले, “किंमत वाढीचा नेहमीच विक्रीवर निश्चित नकारात्मक प्रभाव पडतो. परंतु किंमती किती वाढतील आणि इनपुट खर्च आणि परकीय चलनाची स्थिती काय असेल हे अद्याप माहित नाही.” याशिवाय वाढत्या महागाईसह व्याजदरात सातत्याने होणारी वाढही वाहनांच्या मागणीवर परिणाम करू शकते.