मुक्तपीठ टीम
“सामान्य करदात्यांच्या हितासाठी प्रत्यक्ष कर व्यवस्थेतही ‘एक देश एक कर’ लागू करावा. त्यातून करदात्यांना कर भरण्यात येणाऱ्या समस्या सुटतील. तसेच करदात्यांना भरलेल्या करातून निवृत्ती वेतन देण्याचे धोरण राबवावे,” असे मत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले.
‘आयसीएआय’ डायरेक्ट टॅक्सेस कमिटी आणि आयसीएआय पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रत्यक्ष कर’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सीए चंद्रशेखर चितळे यांच्या हस्ते झाले. कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या परिषदेत ५०० पेक्षा अधिक सनदी लेखापाल सहभागी झाले होते.
प्रसंगी ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, विभागीय समितीच्या सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, सचिव सीए प्रितेश मुनोत, खजिनदार सीए प्रणव आपटे, सदस्य सीए सचिन मिनियार, सीए अमृता कुलकर्णी, सीए ऋषिकेश बडवे आदी उपस्थित होते.
‘टॅक्सेशन ऑफ फ्युचर्स अँड ऑप्शन्स’वर सीए अभिषेक झावरे, ‘बांधकाम क्षेत्रातील करप्रणालीत येणाऱ्या अडचणीं’वर सीए जगदीश पंजाबी, ‘प्राप्तिकर अपिलीय प्राधिकरणाची महत्वाचे निवाडे’ यावर सीए नरेंद्र जोशी व सीए अपूर्वा चांदक्कर, ‘रिट अधिकार व अलीकडील निवाडे’ यावर ऍड. कपिल गोयल, ‘टॅक्सेशन ऑफ पार्टनरशिप फर्म्स’वर सीए पारस सावला, ‘टॅक्सेशन ऑफ पार्टनरशिप फर्म्स टू कंपनीज अँड कंपनी टू एलएलपी’वर सीए विनिता कृष्णन यांनी मार्गदर्शन केले.
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “करदाते आणि सनदी लेखापालांना नवीन करप्रणालीची माहिती व्हावी, यासाठी इन्स्टिट्यूटतर्फे विविध सत्रे आयोजिली जातात. भारतीय सनदी लेखापालांना देशविदेशातही मोठ्या संधी आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि कॅनडा सोबत ऑडिट करणेबाबत करार झाला आहे. कर प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी सातत्याने सूचना व पाठपुरावा केला जातो.”
सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे यांनीही मार्गदर्शन केले. सीए काशिनाथ पठारे यांनी प्रास्ताविकात ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सीए समीर लड्डा यांनी सूत्रसंचालन केले. सीए प्रितेश मुनोत यांनी आभार मानले.