मुक्तपीठ टीम
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १२९ डॉलर वरून ७६ ते ८० डॉलर इतक्या घटल्या आहेत. त्यामुळे भारतात पेट्रोल व डिझेलचे भाव त्वरित कमी करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केली. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून आबनावे यांनी ही मागणी केली आहे. सदर निवेदन त्यांनी पंतप्रधान कार्यालय, तसेच अर्थमंत्रालयालाही पाठवले आहे.
प्रथमेश आबनावे म्हणाले, “कच्च्या तेलाचे भाव सातत्याने खाली येत आहेत. गेल्या एका महिन्यातच जवळपास २० टक्क्यांनी हे भाव कोसळले आहेत. मार्च २०२२ मध्ये कच्च्या तेलाचे भाव १२९ डॉलर प्रति बॅरल होते. ते आता ७६ ते ८० डॉलर प्रति बॅरल इतके खाली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलातील किमतीमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा म्हणून भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन त्वरित इंधन दरात कपात करावी.”
कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात जूनपासून घसरत असल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना व्हायला हवा, कमी झालेल्या किमतींची आधारभूत किंमत आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडली असल्यास इंधन दरकपात का झाली नाही, याची चौकशी करावी. पेट्रोलियम मंत्री म्हणून यासंदर्भात आपण काय कार्यवाही केली? वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किमती काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी ठेवल्या आहेत का? यामध्ये काही हितसंबंध गुंतलेले आहेत का, याची चौकशी करावी आणि यासंदर्भात जनतेला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही आबनावे यांनी निवेदनात केली आहे.