मुक्तपीठ टीम
देशात ऑक्टोबर २०२२पासून 5G दूरसंचार सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जियो आणि एअरटेलनेही देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G दूरसंचार सेवा सुरू केली आहे. आता भारत संचार निगम लिमिटेड देखील लवकरच 5G सेवा सुरू करणार आहे. केंद्रीय दूरसंचार आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यावर्षी, जियो आणि एअरटेलने 5G सेवा सुरू केली. देशातील निवडक शहरांतून सुरू झालेली ही सेवा हळूहळू संपूर्ण देशात पोहोचवण्याची योजना आहे. अशा वेळी जो प्रश्न मनात येतो तो म्हणजे, सरकारी कंपनी बीएसएनएल 5जी सेवा कधी सुरू करणार?
BSNL 5G टेलिकॉम सर्व्हिसबाबत केंद्रीय दूरसंचार मंत्री काय म्हणाले?
- केंद्रीय दूरसंचार आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारी मालकीच्या BSNL चे 4G आधारित तंत्रज्ञान पुढील ५ ते ७ महिन्यांत 5G वर अपडेट केले जाईल.
- देशातील १.३५ लाख दूरसंचार टॉवर्समध्ये ते सुरू केले जाईल.
- सीआयआय उद्योग संस्थेच्या एका कार्यक्रमात बोलताना वैष्णव म्हणाले की, स्वदेशी नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी दरवर्षी ५०० कोटी रुपयांवरून ४ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे.
कोटक बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएलच्या भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव म्हणाले की, “दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल खूप मजबूत स्थितीत असेल. बीएसएनएलचे देशभरात सुमारे १,३५,००० मोबाईल टॉवर आहेत. ”
रिलायन्स जियो आणि एअरटेलचे 5G नेटवर्क अनेक शहरांमध्ये रोलआउट
देशात 5G लाँच केल्यानंतर, प्रथम एअरटेल आणि नंतर जियोने देखील देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. एअरटेलने दिल्ली, मुंबई, वाराणसी, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, कोलकाता, पाटणा आणि गुरुग्राममध्ये 5G सेवा सुरू केली आहे. तर जियोने दिल्ली, मुंबई, पुणे, वाराणसी, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, कोलकाता, पानिपत, नागपूर, गुरुग्राम आणि गुवाहाटी येथे जियो ट्रू 5G सेवा सुरू केली आहे.