मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती ती, गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकांची. आज अखेर या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. गुजरात विभासभा २०२२ निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज झाली. राज्यात पुन्हा एकदा भाजपची सातव्यांदा सत्ता आली आहे. हा विजय २००२ मधील विजयापेक्षा मोठा आहे. राज्यातील भाजपची ही आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. बंगालातील डाव्यांचा सर्वाधिक काळ सत्तेचा विक्रमाची बरोबरी भाजपाने केली आहे.
डाव्यांच्या विक्रमाशी भाजपाची बरोबरी!
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने १९७७ ते २०११पर्यंत सतत ७ वेळा विधानसभा निवडणुका जिंकण्याचा विक्रम केला होता. गुजरातमधील ताज्या विजयामुळे भाजपाने ७व्यांदा विजयाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
२०१७च्या तुलनेत यावेळी दोन्ही टप्प्यात कमी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६०.२० टक्के लोकांनी मतदान केले होते, तर ५ डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात ६४.३९ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
गुजरातमध्ये भाजप १८२ पैकी १५७ जागांवर आघाडीवर
- गुजरातमध्ये भाजप सध्या १५७ जागांवर आघाडीवर आहे.
- काँग्रेस १६ जागांवर तर आम आदमी पार्टी पाच जागांवर आघाडीवर आहे.
- इतर पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहेत.
गुजरातमध्ये १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री पदी शपथविधी सोहळा होणार आहे. भूपेंद्र पटेल पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी होणार आहेत असे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले.
“गुजरातची जनता भाजपसोबत होती आणि यापुढेही राहणार”- रिवाबा जडेजा
क्रिकेट रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजानेही भाजपच्या विजयावर जामनगरमध्ये रोड शो केला. तिने या विजयाचा आनंद साजरा करत म्हटले की, “गुजरातमध्ये भाजपने २७ वर्षे ज्या पद्धतीने काम केले आहे आणि विकासाचे मॉडेल उभे केले आहे, त्यामुळे जनतेलाही भाजपसोबत विकासाचा हा प्रवास पुढे नेण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुजरातची जनता भाजपसोबत होती आणि भविष्यातही राहणार असेही ती म्हणाली.”