मुक्तपीठ टीम
काल बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
कर्नाटक सरकार महाराष्ट्राची गावे घेण्याची घोषणा करत आणि महाराष्ट्रातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारने आता भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी करतानाच केंद्राने देखील यात हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारला कडकसमज दिली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हे प्रकरण कोर्टात असताना या प्रकरणाला चिथावणी कोण देत आहे याची माहिती देखील घेतली गेली पाहिजे.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जर कर्नाटकाने गुंडगिरी थांबवली नाही तर पुन्हा एकदा गनिमी कावा दाखवावा लागेल असा इशारा दिला आहे. इतर गावांची मागणी करणाऱ्या कर्नाटकने अगोदर महाराष्ट्राची बेळगाव, कारवार, बीदर, भालकी इत्यादी गावे महाराष्ट्राला द्या आणि नंतर कांगावा करा ही दादागिरी आणि गुंडगिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही मराठी माणसाला त्याचे उत्तर देता येत नाही असे नाही पण महाराष्ट्राच्या संयमाचा अंत कर्नाटकने पाहू नये असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.
बेळगावसह कर्नाटकातील मराठी माणसांसोबत आम्ही नेहमीच आहोत असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.