धनंजय शिंदे / व्हा अभिव्यक्त!
बीड तालुक्यातील वासनवाडी येथील अप्पाराव भुजंग पवार आपल्या कुटुंबासह २ दिवसांपासून “रद्द करण्यात आलेल्या घरकुलाला पुन्हा मंजुरी मिळावी यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. या कुटुंबाला घरकुल मंजूर होऊन अनुदानाचा १ हप्ताही मिळाला होता. परंतु नंतर मंजुरी रद्द करण्यात आली होती. काल अप्पाराव भुजंग पवार यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृत्यू झाला. सहवेदना आणि अप्पाराव भुजंग पवार यांना भावपूर्ण आदरांजली. शासनाने पवार कुटुंबियांच्या रद्द केलेल्या घरकुलास ताबडतोब मंजुरी द्यायला पाहिजे अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे.
राज्यातील गरीब जनतेला निवाऱ्यासाठी स्वतःचा प्राण द्यावा लागणं हि अत्यंत गंभीर घटना आहे. नुकतेच एका इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातमी नुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत वर्षा निवासस्थानासह अजून दोन बंगल्यांमध्ये (नंदनवन, अग्रदूत) निवास करत असल्याचे समोर आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील सागर निवास स्थानासह मेघदूत बंगल्यावर ताबा आहे.
आपल्या राज्यावर जवळपास ७ लाख कोटींपेक्षा अधिक कर्ज आहे. राज्यातील लाखो नागरिक घराविना संघर्ष करत आहेत. राजधानी मुंबई शहरात जवळ जवळ ६५% हून अधिक जनता झोपडपट्टीत राहत आहे. परंतु राज्यकर्ते मात्र या कठीण परिस्थितीत देखील निर्ढावलेल्या प्रमाणे अनेक बंगल्यामध्ये वास्तव्य करत आहेत.
राज्य आर्थिक संकटात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या वागण्यातून संवेदनशीलता दाखवत जनतेसमोर आदर्श निर्माण करायला हवा. आम आदमी पक्षाची मागणी आहे की या दोघांनी तसेच इतर कुठल्या मंत्र्यांनी एकापेक्षा अधिक निवासस्थाने वापरू नये आणि अतिरिक्त निवासस्थाने रिक्त करावीत.
(धनंजय शिंदे हे आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे राज्य सचिव आहेत)