मुक्तपीठ टीम
आता डिजिटलायझेशनच्या जमान्यात सर्व काही स्मार्ट झाले आहे. लोक स्मार्टफोन वापरू लागले आहेत. त्यामुळे क्वचित लोक वेळ पाहण्यासाठी घड्याळाचा वापर करतात. परंतु, एक वर्ग असाही आहे ज्यांना घड्याळ घातल्याशिवाय जमतच नाही. स्मार्टवॉच आल्यापासून तर बऱ्याच जणांनी यापासून प्रभावित होऊन याची खरेदी केली. बदलत्या काळानुसार घड्याळांचे स्वरूप बदलले. तसेच, एक काळ असा होता की घड्याळ म्हणजे फक्त एचएमटी ब्रॅंडचे होते. एचएमटी म्हणजे ९०च्या दशकातील एक सुप्रसिद्ध ब्रॅंड होता.
एकेकाळी ९०च्या दशकात भारतातील लोकसंख्येचा एक मोठा वर्ग एचएमटीसाठी वेडाहोता. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान मशीन टूल्स म्हणजेच एचएमटीने १९६१मध्ये पहिल्यांदाच हे घड्याळ बनवले. त्यानंतर अनेक दशक याची बाजारात चर्चा राहिली. भारतात उदारीकरणानंतर एचएमटीची क्रेझ कमी होऊ लागली, जी गेल्या काही दशकांत संपली आहे.
जवळपास ५०वर्षे चर्चेत असणारे एचएमटी घड्याळ १९६१ मध्ये देशात लाँच करण्यात आले. एचएमटीची स्थापना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशानुसार झाली होती. त्या काळात जपानच्या सिटीझन वॉच कंपनीच्या सहकार्याने एचएमटीचे उत्पादन सुरू झाले.
आजच्या काळात एचएमटीचे घड्याळ हे केवळ आठवणीतच!
- एक काळ असा होता की परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलांना एचएमटी घड्याळे भेट दिली जायची.
- लग्नसमारंभात वराला एचएमटी घड्याळ देण्याची प्रथा होती आणि कार्यालयातून निवृत्तीनंतर स्मृतिचिन्ह म्हणूनही ते दिले जायचे.
- ९०च्या दशकात सर्वसामान्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला एचएमटी आता केवळ एक आठणच बनून राहिला आहे.
- १९९०पर्यंत सर्व काही ठीक होते. पण तेव्हापासून कंपनीची आर्थिक स्थिती ढासळू लागली आणि कंपनीचा वाईट काळ सुरू झाला. अशा स्थितीत सततच्या तोट्यामुळे अखेर सरकारने ते बंद करण्याचा निर्णय घेतला.
आर्मी कॅन्टीनमध्ये एचएमटीची क्रेझ!
- त्या काळात एचएमटी घड्याळांसाठी लोकांना आर्मी कॅन्टीनमध्ये बराच वेळ थांबावे लागत असे.
- एचएमटीला देशभरातून वर्षाला सुमारे सहा लाख घड्याळांची ऑर्डर मिळायची.
- लष्कराच्या कॅन्टीनला घड्याळे पुरवण्यासाठी जवळपास एक महिना लागायचा.
- आर्मी कॅन्टीनमध्ये एचएमटी घड्याळ येण्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती.