दिवाकर शेजवळ/ व्हा अभिव्यक्त!
मोदी सरकारचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांचा ‘एन डी टीव्ही’वरील कब्जा आणि रवीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर ‘मातम’ सुरु झाले आहे. शोककल्लोळ उडाल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. रविश कुमार हे लगेचच यु ट्यूबवर हजरही झाले आहेत. त्यांचा कित्ता गिरवत ‘यु ट्यूब चॅनल’ सुरू करण्यासाठी इतरांनाही उत्तम वातावरण निर्मिती अदानी यांनी आयतीच तयार करून दिली म्हणायचे .चॅनेलच्या ‘क्राऊड फंडिंग’ साठी यापूर्वी कधी नव्हते, इतके अनुकूल वातावरण आता यु ट्यूब चॅनलच्या प्रवर्तकांना लाभू शकते.
पण २०१०-१२ च्या दरम्यान काँग्रेसच्या मनमोहनसिंग सरकारच्या बदनामीसाठी ‘कॅग’ ( विनोद राय) चा वापर करून घेत लोकपालची मागणी करत भ्रष्टाचार हटाओ आंदोलन दिल्लीत उभे केले गेले होते. तोच कॅग आता शिवसेनेच्या हाती असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या मागे चौकशीसाठी लावला आहे.
त्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ‘अण्णा गॅंग ‘मध्ये कोण कोण सामील होते आणि त्यावेळी अण्णांच्या भजनी लागून जनतेला त्यांच्या नादी लावण्यासाठी कोण झटत होते? त्यांची नावे आणि चेहरे सध्याच्या शोकाकूल वातावरणात किती लोकांना आठवत असतील, यात शंकाच आहे.
अण्णा गँगच्या आंदोलनाची नैतिक उंची वाढविण्यासाठी त्या काळात हितसंबंधित नोकरशहा आणि राजकारणाचे आकलन -समज कमी असलेल्या अनेक सेलिब्रिटींनी म्हणजे नामवंतांनी हातभार लावला होता. आपली प्रतिष्ठा खर्ची घातली होती. काही समाजवादी साथी, पुरोगामी मंडळी तर अण्णांवर जीव- भाव उधळताना दिसली होती. अभिनेत्री शबाना आझमी यासुद्धा मै हुं अण्णाची टोपी घालून वावरत- मिरवत होत्या.
आता मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचीही तीन वर्षे सरत असताना त्यातील बरेच सेलिब्रिटी दडून बसले आहेत. त्यातील काही जण राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आढळले. पण अण्णा गँगला साथ देण्याच्या आपल्या हातून घडलेल्या चुकीची कबुली देत माफी मागण्याचा दिलदारपणा त्यांच्यापैकी कुणीही दाखवला नाही. हेच लोक ‘ मै हुं अण्णा’ ची टोपी डोक्यावर चढवून कधी दिल्लीत जंतर मंतर, तर कधी मुंबईतील बिकेसी मैदान गर्दीने फुलवत मोदी आणि त्यांच्या भाजपसाठी मशागत करत होते. आज मोदींच्या विरोधात दंड थोपटणारेही त्यावेळी अण्णा गँगसाठीच आपली सारी शक्ती पणाला लावत होते. देशात मोदींचे सरकार आणण्याच्या श्रेयाचे मानकरी तेही आहेत, हे कसे विसरता येईल?
अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील त्या आंदोलनाद्वारे लोकपालची मागणी करतानाच सनदी अधिकाऱ्यांना राजकारण प्रवेशासाठी निवृत्तीनंतर पाच वर्षांचा कुलिंग पिरियड म्हणजे मनाई लागू करण्याची मागणी पुढे रेटण्यात आली होती. पण भाजपला केंद्रात सत्तेवर आणण्याचे अण्णा गँगचे इप्सित साध्य झाल्यावर नेमके विपरित घडले.
दिल्लीतील त्या आंदोलनात आघाडीवर राहिलेले माजी लष्करप्रमुख व्ही के सिंग, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ सत्यपाल सिंग हे केंद्रात मंत्रीपदावर विराजमान झाले, किरण बेदी नायब राज्यपाल बनल्या. अन अरविंद केजरीवाल यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून दिल्ली आणि पंजाब ही दोन राज्ये हस्तगत केली आहेत. शिवाय, मोदी सरकारने ‘ कुलिंग पिरियड’ ची अट लागू करण्याऐवजी नोकरशहांची निवृत्तीनंतर लगेचच बड्या पदावर वर्णी लावण्याचा सपाटाच लावला आहे. ते पाहून अण्णा हजारे हे गारठून गेले नसते तरच नवल!
‘अण्णा गॅंग’च्या फसव्या बिगर राजकीय, पण भाजप पुरस्कृत आंदोलनाची आठवण काढताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा हटकून आठवतो. मै हुं अण्णांच्या टोप्या घालून त्या काळात काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलने सुरू होती. त्यावरून गणेशोत्सवाच्या धामधुमीत बाळासाहेबांमधला ‘व्यंगचित्रकार’ जागला होता. एका मुलाखतीवेळी त्यांना सुचलेली व्यंगचित्राची कल्पना सांगताना ते म्हणाले: माझी गात्रे थकली आहेत. हात, बोटे चालत नाहीत. पण या गणेशोत्सवात मला गणराया पुढच्या उंदराला ‘ मै हुं अण्णा’ ची टोपी व्यंगचित्रात चढवायची होती.
(दिवाकर शेजवळ हे ज्येष्ठ पत्रकार असून सामाजिक क्षेत्रातही ते दलित चळवळीतील विविध संघटनांच्या माध्यमातून सक्रिय होते. सध्या ते ‘आंबेडकरी संग्राम’चे नेतृत्व करतात.)